संजय तिसऱ्या वेळी इस्टोनिया रॅलीत सहभागी
पुणे ः पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने तिसऱ्या वेळी युरोपीय रॅली मालिकेतील इस्टोनिया रॅलीत भाग घेतला आहे.
लॅट्वियाचा एडगर्स स्वेन्सीस जयचा नॅव्हीगेटर असेल. बाल्टीक मोटरस्पोर्टसने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर 2 कार तो चालवेल. संजयने रेकी पूर्ण केली आहे.
संजयने 2016 मध्ये सर्वप्रथम या रॅलीत भाग घेतला. त्यावेळी न्यूझीलंडचा मायकेल यंग नॅव्हीगेटर होता. तेव्हा त्याने सुबारू इम्प्रेझा कार चालविली होती. फोर व्हील ड्राईव्ह गटात तो दुसरा व एकूण क्रमवारीत पाचवा आला होता. युरोपातील रॅलीत पदार्पणात करंडक जिंकण्याचा पराक्रम त्याने केला होता.
मागील वर्षी त्याने एडगर्स याच्या साथीत भाग घेतला होता. त्यावेळी त्याने रॅली यशस्वीरित्या पूर्ण केली होती. इएमव्ही गटात तो 29 स्पर्धकांत 23वा, तर एकूण क्रमवारीत 43 स्पर्धकांत 37वा आला होता.
संजयने सांगितले की, ही रॅली जागतिक मालिकेची (डब्ल्यूआरसी) चाचणी फेरी आहे. लॅट्विया, इस्टोनिया या रॅलींमध्ये शिकण्याची, प्रशिक्षणाची, स्पर्धात्मक सरावाची संधी मिळते. यापूर्वी मी दोन वेळा भाग घेतला आहे. गेल्या वर्षी फिनलंड रॅलीद्वारे जागतिक पदार्पण करताना मी तयारीसाठी येथे सहभागी झालो होतो. येथील मार्गाचा मला अंदाज आहे. एडगर्स हा व्यावसायिक नॅव्हीगेटर आहे. त्याच्याकडून शिकण्याचा दृष्टिकोन आहे.
रॅलीचे एकूण लेग 2
सेक्शन 8
स्पेशल स्टेजेस 15
एकूण अंतर 795.15 किमी
स्पेशल स्टेजेसचे अंतर 151.98 किमी
पॉवर स्टेजेस ः 2 (14, 8)