पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अथर्व येलभर याने तर, मुलींच्या गटात अनन्या दलाल, मृणाल शेळके या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात दहाव्या मानांकित अनन्या दलाल हिने सातव्या मानांकित अद्विता गुप्तावर 6-3 असा विजय मिळवला. बिगरमानांकीत मृणाल शेळके हिने तेराव्या मानांकित ईमान वीरजीचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. दुसऱ्या मानांकित मेहक कपूर हिने आरोही देशमुखवर 6-0 असा विजय मिळवला. सहाव्या मानांकित ह्रितिका कापले हिने नवव्या मानांकित वसुंधरा भोसलेला 6-3 असे नमविले.
मुलांच्या गटात बिगरमानांकीत अथर्व येलभर याने चौथ्या मानांकित सक्षम भन्साळीचा 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित दिवीज पाटील याने राम मगदूमचे आव्हान 6-3 असे मोडीत काढले. नील केळकरने नमिश हूडचा 6-2 असा, तर पाचव्या मानांकित अयान शेट्टीने अर्जुन वेलुरीचा 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.