आशिया पॅसिफीक रॅली मालिका होक्कायडो रॅली 2017
आठ तासांची पेनल्टी बसूनही संजय गटात तिसरा- दोन टायर पंक्चर होऊनही सुपर रॅलीत 20 गुणांची कमाई
पुणे – पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टाकले याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील होक्कायडो रॅलीत आठ तासांची पेनल्टी बसूनही आशिया करंडक गटात तिसरा क्रमांक मिळविला. एकुण क्रमवारीत तो पंधरावा आला.
जपानमधील होक्कायडो बेटावर ही रॅली शनिवारी व रविवारी पार पडली. भारताचा गौरव गील सर्वसाधारण तसेच गटात विजेता ठरला. संजयचा एम्पार्ट संघातील सहकारी रॉबर्ट ब्लाॅमबर्ग गटात दुसरा आला.
तिसऱ्या स्टेजमध्ये तीन तिघाडा
या रॅलीची तिसरी स्टेज स्पर्धकांसाठी जणू काही शापच ठरली. संजयसह तब्बल सहा जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे माघार घ्यावी लागली. ओले व्हीएबी याची कार तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. संजयचा सहकारी यारी केटोमा याची कार भरकटली. संजयचा पूर्वीच्या कुस्को संघातील सहकारी मायकेल यंग याच्या कारचे इंजिन बिघडले. यासुशी ओयामा याची कार उलटली, तर यानुनोरी हागीवारा याच्या कारचे ब्रेक फेल झाले. संजयच्या कारचे मागील बाजूचे डावे चाक आधी पंक्चर झाले. ते बदलून त्याने रॅली पुढे सुरु केली, पण जेमतेम २००-३०० मीटर अंतर जाताच मागील बाजूचे उजवे चाक पंक्चर झाले. स्टेपनी एकच असल्यामुळे त्याला माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पहिल्या लेगमधूनही त्याला माघार घ्यावी लागली. कारचे काही काही नुकसान झाले नव्हते, पण सर्व्हिस पार्कमधून एम्पार्ट संघाचे तांत्रिक पथक वेळेत येऊन त्याला रॅली पुढे वेळेत सुरु करणे शक्य नव्हते.
सुपर रॅली समाधानकारक
संजयला पहिला लेग पूर्ण करता आला नाही, पण त्याने नव्या उत्साहात रविवारी सुपर रॅली भाग घेतला. स्टेजगणिक त्याने समाधानकारक वेग राखला. ओटोफुके रिव्हर्स एक स्टेजला 17वा, न्यू होनबेत्सूला 13वा, न्यू ओशोरो लाँग एकला 12वा, ओटोफुके रिव्हर्स दोनला 15वा, न्यू होनबेत्सू दोनला 12वा अशी त्याची कामगिरी झाली. सॅमो सात्सुनाई या सुपर स्पेशल स्टेजमध्ये त्याने सातव्या क्रमांकावर झेप घेत टाॅप टेनिस फिनीश नोंदविला.
रविवारी दुसरा लेग झाला. त्यात संजय 18 स्पर्धकांत 12वा आला. त्याने 49 मिनीटे 33.4 सेकंद वेळ नोंदविली. संजयने 5 बोनस गुणांसह एकुण 20 गुणांची कमाई केली. आशिया करंडक गुणतक्त्यात तो तिसरा आहे.
संजयने सांगितले की, नवी कार वेगवान आहे. तिच्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यासाठी जास्त सराव आणि स्पर्धात्मक सहभागाची गरज आहे. रविवारी दाखविलेली लढाऊ वृत्ती महत्त्वाची होती. माझी नॅव्हीगेटर नोरिको ताकेशिता जपानी आहे. तिची साथ बहुमोल ठरली.
निकाल (आशिया करंडक) : 1) गौरव गील- स्टीफन्स प्रीव्होट (टीम एमाआरएफ, 1 तास 53 मिनीटे 21.8 सेकंद), 2) रॉबर्ट ब्लाॅमबर्ग- लार्स अँडरसन (एम्पार्ट स्पोर्ट, 2:05:03.2), 3) संजय टकले-नोरिको ताकेशिता (एम्पार्ट स्पोर्ट, 10:22:10.7)