पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे 14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत ओएनजीसी व बीपीसीएल या संघांनी अनुक्रमे जीएआयएल व इंडियन ऑईल या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या बिलियर्ड्स स्पर्धेत सांघिक गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात गतविजेत्या ओएनजीसी संघाने जीएआयएल संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. जागतिक विजेता पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत इशप्रित चड्डाचा 208(124)-66अशा गुणांनी पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. पंकज याने आपल्या खेळीत 124 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आलोक कुमारने आशुतोष पाधीवर 200(81,67)-44 अशा फरकाने विजय मिळवला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत बीपीसीएल संघाने इंडियन ऑईलचा 2-0अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. बीपीसीएल एस श्रीकृष्णनने इंडियन ऑईलच्या ब्रिजेश दमानीचा 200(63,57)-53असा पराभव केला. एस श्रीकृष्णनने आपल्या खेळीत 63व 57गुणांचा ब्रेक नोंदविला. मनन चंद्रा याने ध्वज हरियाचा 202(61)-73(57)असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचा सांघिक गटातील ओएनजीसी व बीपीसीएल यांच्यातील अंतिम फेरीचा सामना आज(दि.21 फेब्रुवारी रोजी)सकाळी 10 वाजता होणार आहे.
याआधीच्या बाद फेरीत इंडियन ऑईल संघाने एनआरएलचा 2-0असा पराभव केला. यामध्ये ब्रिजेश दमानीने पंकज रॉय 201-51असा तर, ध्वज हरियाने सईद तझुद्दीन अली अहमदचा 201-10असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मनन चंद्रा, एस श्रीकृष्णन यांच्या विजयी कामगिरीच्या सामन्यात बीपीसीएल संघाने एमआरपीएल 2-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचे उदघाटन बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे, क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव शशांक हळबे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सांघिक गट: उपांत्यपूर्व फेरी: इंडियन ऑईल वि.वि.एनआरएल 2-0(ब्रिजेश दमानी वि.वि.पंकज रॉय 201-51; ध्वज हरिया वि.वि.सईद तझुद्दीन अली अहमद 200(94)-10);
बीपीसीएल वि.वि.एमआरपीएल 2-0(मनन चंद्रा वि.वि.आतिश श्रीवास्तव 201-25; एस श्रीकृष्णन वि.वि.जे पी शेट्टी 200-38);
जीएआयएल वि.वि.ऑईल 2-0(आशुतोष पाध्ये वि.वि.ए कमलपुरी 200-50; इशप्रित चड्डा वि.वि.तुलन बरुआ 200(94)-88);
उपांत्य फेरी: ओएनजीसी वि.वि.जीएआयएल (पंकज अडवाणी वि.वि.इशप्रित चड्डा 208(124)-66; आलोक कुमार वि.वि.आशुतोष पाधी 200(81,67)-44);
बीपीसीएल वि.वि.इंडियन ऑईल( एस श्रीकृष्णन वि.वि.ब्रिजेश दमानी 200(63,57)-53; मनन चंद्रा वि.वि.ध्वज हरिया
202(61)-73(57);