पुणे-तुतारीची ललकारी… सनई चौघड्याचा मंगलमय सूर आणि श्री शिवछत्रपतींचा प्रचंड जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणा-या अष्टसहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. श्री शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक पुतळ्यासोबतच सरदार कान्होजी जेधे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासोबतच सरसेनापती वीरबाजी पासलकर, मानाचे पहिले पान सरदार कान्हेजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे या घराण्यांच्या प्रतिनिधींचा स्वराज्य रथ सोहळ्यामध्ये ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल जिरेटोप देऊन गौरव करण्यात आला.
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन पुणेमहापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मंगोलीया येथे शरीरसौष्ठव स्पर्धेत मीस्टर वर्ल्ड किताब विजेते महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. शिवरायांचरणी ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली. यंदा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात प्रथमच सहभागी झालेल्या गरुड, घारे, काटे, निंबाळकर, संत तुकाराम महाराज भक्तीशक्ती, महाडीक आणि कोंढाळकर या स्वराज्यघराण्यांचा सन्मान करण्यात आला. श्रीनाथ भिमाले म्हणाले की, पुण्यात साज-या होणा-या दीपोत्सवाचा शिरोमणी म्हणून हा दीपोत्सव पुणेकरांच्या ह्रदयात विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यासारखा दिमाखदार उत्सव साजरा होतो. हा सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या ऐतिहासिक पुतळ्याने ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुतळयाचे वजन ८ हजार किलो आहे. त्यामुळे सलग सहाव्या वर्षी प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली . कार्यक्रमाचे नियोजन रवींद्र कंक, सचिन पायगुडे, गिरीश गायकवाड, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, निलेश जेधे, अनिल पवार, किरण देसाई, राजाभाऊ ढमढेरे, गोपी पवार, मयुरेश दळवी, किरण कंक, निलेश जगताप, युवराज शिंदे, सुशांत साबळे, सुभाष सरपाले आदींनी केले.