पुणे- महापालिका वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांच्या डोक्यावर छत्री धरली आहे … पहा हे छायाचित्र … अर्थात
प्रभाग क्र.७४ धनकवडी-चैतन्यनगर-भारती विद्यापीठ परिसरातील वाहतुकीच्या विविध समस्याची पाहणी करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ.प्रविण मुंढे आणि श्रीनिवास बोनाला यांच्या बरोबर प्रभागातील वाहतुकी संदर्भातील प्रलंबित विषयांची पाहणी विशाल तांबे यांनी केली. यावेळेचे हे छायाचित्र आहे .
पार्किंगमुळे होते वाहतुकीची कोंडी अशी केली तक्रार
लोकांनी वाहने लावायची कुठे?असा प्रश्न एकीकडे उपस्थित होत असताना रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे गाऱ्हाणे यावेळी अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आले . यामध्ये धनकवडी पोस्ट ऑफिस चौक ते त्रिमूर्ती चौक, शाहू बँक चौक ते धनकवडी पोस्ट ऑफिस चौक, त्रिमूर्ती चौक ते सरहद चौक , शाहू बँक चौक ते अहिल्यादेवी चौक या प्रमुख ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत पार्किंग-अवैध ३ व ६ आसनी रिक्षांची प्रवासी वाहतूक व नो-पार्किंग झोन या सर्व विषयांची पाहणी करून सदर सर्व ठिकाणी वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश श्री. डॉ. प्रविण मुंढे यांनी दिले.
याबाबत अनेक वेळा लेखी निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली होती. याआधी देखील प्रभागातील वरील सर्व प्रमुख रस्त्यारील कारवाईबाबत पुणे महानगरपालिका व भारती विद्यापीठ वाहतूक विभाग यांनी सदर सर्व ठिकाणी संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे नियोजन केले होते. तसेच धनकवडी पोस्ट ऑफिस चौक ते त्रिमूर्ती चौक हा रस्ता गेले अनेक वर्ष अरुंद होता. पुणे महानगरपालिकेच्या वतीने व परिसरातील सोसायट्या व नागरिकांच्या सहकार्याने गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला रस्तारुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
वरील प्रमुख रस्त्यावर अनेक खाजगी बसेस व ट्रक, खाजगी गाड्या यांचे अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच राजश्री शाहू बँक चौक या ठिकाणी अनधिकृत व अवैध प्रकारे ६ आसनी व ३ आसनी रिक्षा अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याचे डॉ.प्रविण मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत कार्यवाहीची मागणीकरण्यात आली . वरील सर्व विषयांची प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर धडक कारवाई करण्याचे आदेश डॉ.प्रविण मुंढे यांनी दिले.
याबाबत डॉ.प्रविण मुंढे व श्रीनिवास बोनाला यांच्या संयुक्त पाहणीमुळे याभागातील वाहतूक समस्या सुटण्यास निश्चितपणे मदत होईल असा विश्वास वाटतो व यासाठी पुढच्या काळात देखील पाठपुरावा करणार आहे.