पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा मेरूमणी म्हणून ओळखल्या जाणा-या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या बुधवार दि. ७ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. महोत्सवाचे हे ६४ वे वर्ष असून शास्त्रीय संगीताची मेजवानी पुढील पाच दिवस रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. या महोत्सवासाठी रमणबाग येथील न्यू इंग्लीश स्कूलच्या मैदानात सुरू असलेली तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या महोत्सवासाठी तब्बल ८० हजार स्केअर फुटाचा मंडप टाकण्यात आला असून यामध्ये ८ ते १० हजार रसिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय यावर्षी लाल आणि पांढ-या रंगाची सजावटही मंडपात कारण्यात आली आहे. महोत्सवासाठी येणा-या रसिकांच्या सोयीसाठी रानडे बालक मंदिर व नदीपात्र येथे चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल या पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक संस्थेने बसेसची विशेष सेवा देण्याचे मान्य केले आहे . त्यानुसार रमणबाग ते कात्रज, रमणबाग ते आनंदनगर मार्गे सिंहगड रस्ता, धायरी, रमणबाग ते कोथरूड डेपो आणि रमणबाग ते कर्वेनगर या मार्गांचा समावेश आहे.