पुणे : रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे (वय 44)हिचे काल रात्री निधन झाल्यानंतर आज सकाळी तिच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . तत्पूर्वी टिळक स्मारक मंदिर येथे अंत्यदर्शनासाठी तिचे पार्थिव ठेवण्यात आले होते . यावेळी विक्रम गोखले, मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे,प्रसाद ओक , सिद्धेश्वर झाडबुके, श्रुती मराठे , प्रवीण तरडे , अशोक शिंदे ,शर्वरी जेमनीस , नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संजय ठुबे , सुनील महाजन , निकिता मोघे , डॉ. सतीश देसाई ,दीपक रेगे, प्रशांत तपस्वी,योगेश सुपेकर, विजय कोटस्थाने ,मोहन कुलकर्णी, नगरसेवक निलेश निकम , रवींद्र माळवद्कर, माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे आदी मान्यवरांनी यावेळी अश्विनीला आदरांजली वाहिली .
भरत नाट्य मंदिर येथे “नाट्यत्रिविधा‘ हा नृत्य, नाट्य, संगीताचा विशेष कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. यात अश्विनी एकबोटे यांच्यासह डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर अनुपमा बर्वे या कलावंतांचा समावेश होता. नृत्य मैफलीच्या समारोपाला एकबोटे या नृत्य सादर करणार होत्या. नृत्य सुरू झाले; पण समारोपाक्षणी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्या रंगमंचावरच कोसळल्या. त्यामुळे कार्यक्रम थांबवण्यात आला. भरत नाट्य मंदिराशेजारीच असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना तातडीने दाखलही करण्यात आले; पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर असा परिवार आहे.
हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून एकबोटे यांची ओळख होती. चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. “देबू‘, “महागुरू‘, “बावरा प्रेम हे‘, “तप्तपदी‘, “आरंभ‘, “हायकमांड‘, “एक पल प्यार का‘, “क्षण हा मोहाचा‘, “मराठा टायगर्स‘ अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. “दुहेरी‘, “दूर्वा‘, “राधा ही बावरी‘, “तू भेटशी नव्याने‘, “कशाला उद्याची बात‘, “अहिल्याबाई होळकर‘, “ऐतिहासिक गणपती‘ या मालिकांत “त्या तिघींची गोष्ट‘, “एका क्षणात‘, “संगीत बावणखणी‘ या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. त्या नृत्यसंस्थाही चालवत होत्या.