पुणे-सालस आणि घरंदाज भूमिकांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आपल्या कुटुंबात आणि विशेषतः मुलांमध्ये रमलेली रेणुका मध्यंतरी काही रिअलिटी शो मध्ये दिसली होती पण चित्रपट आणि मालिका या फार वेळ घेतील कुटुंबापासून बराच अवधी दूर ठेवतील या भीतीने रेणुकाने आपले काम कमी केले होते .पण आता रेणुका ‘खिचडी’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वात दिसणार आहेत. बऱ्याच काळानंतर रेणुका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर ‘खिचडी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेणुका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. तिची भूमिका छोटेखानी असली तरी महत्त्वाची असणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या पर्वातून निर्माता-अभिनेता जमनादास मजीठिया आणि लेखक- अभिनेता आतिश कपाडिया यांची मुलंसुद्धा टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करणार आहेत.