पुणे-देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने दूरदृष्टीने काम करीत देश सामर्थ्यवान बनवणार्या व्यक्तींना ‘धम्मा विरियो फाउंडेशन’ तर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवले जाते. यंदा तंत्रज्ञानाचा वापर वाढवून जनतेचे जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करणार्या पुण्याच्या शशांक वाघ यांना‘धम्मा विरियो फाउंडेशन’तर्फे यंदाचा ‘डॉ. बी. आर. आंबेडकर प्रेरणा सन्मान’ देऊन गौरवले जाणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. 22 जुलै 2019 रोजी सायं. 4.00 वाजता नवी दिल्लीतील कॉस्टिट्युशन क्लब येथे होणार असून केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पास्वान यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय पशुपालन मंत्री गिरीराज सिंग, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा,केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांसह अनेक खासदार उपस्थित राहणार आहेत.
पुण्याचे शशांक वाघ हे बँकींग तज्ञ असून वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान भारतात आणून भारतीयांचा जीवनस्तर सुखात आणि काळानुसार अद्ययावत करण्याची महत्वाचे कार्य ते करीत आहेत.
बिनतारी संदेश यंत्रणेद्वारा इंटरनेटचे संदेश ग्रामीण भागात, दुर्गम भागात पोहचवणे, शहरी भागात अद्ययावत अॅटोमॅटिक मीटर रिडिंग यंत्रणेद्वारा जनजीवन सुसह्य करणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्टेमसेल द्वारा कॅन्सर, डायबेटीस, अर्धांगवायू अशा दुर्धर रोगांवर वाजवी दरांमध्ये परदेशातील उपचार पद्धती भारतात उपलब्ध करून देणे आणि बर्फावरील खेळ भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात उपलब्ध करून देणे या क्षेत्रात ते काम करीत आहे.