पुणे : इच्छुकांना आता विधानसभेचे वेध लागले असून प्रत्येकाने आपापली फिल्डिंग आपापल्या पद्धतीने लावण्यास सुरुवात केली असून पुण्यात कसबा विधानसभा मतदार संघात उमेदवारीपासून ते मतदानापर्यंत चुरस राहील असे दिसते आहे .लोकसभा लढविलेले गिरीश बापट आता कसब्याच्या रिंगणाच्या बाहेरच असतील, आणि त्यांचे कोणी कुटुंबीय देखील आता येथे उमेदवार नसतील याच अनुषंगाने भाजप मध्ये तयारी दिसून येत असून या मतदार संघातून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारी साठी सध्या तरी सर्वाधिक पसंती महापौर मुक्ता टिळक यांना दिली जात आहे तर कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या गोटातून महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या उमेदवारी साठी सर्वाधिक पसंती दिली जाते आहे .
पालकमंत्री गिरीश बापट भाजपच्या वतीने लोकसभा लढविली . त्यामुळे येत्या विधानसभेत कसब्याचे नेतृत्व आता कोण करणार, याची उत्सुकता पक्ष कार्यकर्त्यात जोरात आहे. पक्षासाठी खपलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळणार की बापट यांची घराणेशाही सुरू होणार होणार यावर लक्ष केंद्रित होताना दिसते आहे.त्यात विशाल धनवडे सारखे सेनेतील इच्छुक आता कसबा शिवसेनेला सोडा असा जोरदार आग्रह करत आहेत . अर्थात विधानसभेला युती कायम राहिली तर हा प्रश्न उदभवणार आहे.आणि हा निर्णय लोकसभेच्या निकालावर अवलंबून राहील असे दिसते आहे.
आमदार या नात्याने बापट गेली 25 वर्षे कसब्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून कसब्यातून आमदार होण्याची अनेकांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. बापट यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर यापैकी अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विद्यमान महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर, नगरसेवक धीरज घाटे व हेमंत रासने यांची नावे यात प्रामुख्याने चर्चेत आहेत.बिडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्याचप्रमाणे घाटे व रासने यांचाही मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क आहे. बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यादेखील गेल्या वर्षभरापासून पुण्यात सक्रिय आहेत. बापट यांच्यासोबत जवळपास सर्व कार्यक्रम, सभा-सभारंभात त्या वावरत असतात. केवळ बापट यांचे चिरंजीव गौरव यांच्याशी विवाह झाला म्हणून नव्हे तर माहेरी सांगलीत त्या अनेक वर्षे पक्षाचे काम करीत होत्या. त्यामुळे त्यांचे नाव आयत्या वेळी पुढे आल्यास बापटांची घराणेशाही नको असा त्यांना विरोध काही प्रमाणात होणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली असून लोकसभेचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी यांनी आजपासून (शनिवार) काँग्रेस भवन येथे विधानसभानिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कसबा मतदारसंघाची बैठक आज होणार असून त्यानंतर पुढील आठवडाभर उर्वरित सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.
लोकसभेची उमेदवारी अगदी तोंडाजवळ येवून हुकल्याने आता कसबा विधानसभेची उमेदवारी मात्र अरविंद शिंदे यांना नक्की मिळेल असा विश्वास अनेकांना आहे. या शिवाय पालिका निवडणूक काळात कॉंग्रेस मध्ये आलेले रवी धंगेकर हे त्यांचे पक्षांतर्गत प्रमुख स्पर्धक असणार आहेत .