पुणे-सिनेतारका आशा काळे आणि ज्योती बोरा यांनी स्वतः सादर केलेली उकडीच्या मोदकांची प्रात्यक्षिके, आशा काळे यांनी फुगड्यांमध्ये घेतलेला सहभाग. सुमारे ३०० हून अधिक महिलांनी केलेले तिखट व गोड महाराष्ट्रीयन पदार्थ, शेफ सर्वेश जाधव यांची रुचकर खाद्य पदार्थांची प्रात्यक्षिके व त्यानंतर सादर झालेले मंगळागौरीचे खेळ अशा वातावरणात पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा आज नवी पेठेतील संकल्प हॉल येथे पार पडली. चित्रपट निर्माते व ‘सार्वजनिक काका’ सन्मानाने विभूषित कै. चारूकाका सरपोतदार यांचा स्मृतीप्रित्यर्थ याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विस्मृतीत गेलेले खास महाराष्ट्रीयन तिखट पदार्थ महिला स्पर्धकांनी घरून करून आणायचे होते तर गोड पदार्थ स्पर्धेच्या ठिकाणी करायचे होते. तिखट पदार्थांमध्ये भासवाडी रस्सा, कोवळ्या बांबूची भाजी व लोणचे, दाल ढोकले, खाकरा, भाकरीचा काला अशा पदार्थांबरोबरच गोड पदार्थांमध्ये सुधारस, मोदक, शिरा अशा खाद्य पदार्थांना महिला स्पर्धकांनी विशेष पसंती दिली होती. परीक्षक म्हणून अभिनेत्री व गायिका सायली सांभारे, अभिनेत्री दीप्ती सोनावणे-क्षीरसागर उर्फ चंदा, निवेदिका स्वाती सदरे, शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठानच्या सचिव अंगाई खेबूडकर, दूरदर्शन आकाशवाणी सुप्रसिद्ध निवेदिका रत्ना दहिवेलकर आणि चीफ को-और्डीनेटर अजित कुमठेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धा संपत असतांना सिनेतारका आशा काळे आणि ज्योती बोरा यांनी खास उकडीचे मोदक तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांची वाह वा मिळवली. त्यांचा हस्ते विजेता स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी त्या म्हणाल्या कि, मोदक हा माझा आवडता पदार्थ असून स्वतःचे हाताने मोदक तयार करणे यावर माझा कटाक्ष असतो. साचा वापरून मोदक केलेले मला आवडत नाही. मी केलेले मोदकाचा सारण आणि मोदक सर्वांना फार आवडतात त्याचा मला आनंद आहे. चारूकाका सरपोतदारांमुळे मी चित्रपट सृष्टीत आले त्या मुळेच या कार्यक्रमात मी आवर्जून सहभागी झाले.
पूना गेस्ट हाउस, ऑस्टिन 40 कॅफे हाऊस आणि इट आउट @ टपरी यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे पुणे फेस्टिव्हल करता आयोजन केले होते. पूना गेस्ट हाउस चे किशोर सरपोतदार, अंजली वागळे, रचना पाटील आणि शेफ सर्वेश जाधव यांचा संयोजनात मोठा सहभाग होता.
स्पर्धेच्या निकाल प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे डॉ. सतीश देसाई आणि मोहन टिल्लू उपस्थित होते. भारत गॅस हे याचे प्रायोजक होते.
यावेळी मनस्विनी ग्रुप ने मंगळागौरीचे विविध खेळ सादर करून प्रचंड टाळ्या मिळवल्या. त्यामध्ये विविध प्रकारच्या फुगड्या, पाणी लाटा, अट्टूश पान, सईबाईचा कोंबडा, दिंड, तांदूळ सडू, सोमू गोमुचा गाडा, भोवर भेंडी, किस बाई किस दोडका किस, आगोटा पागोटा, ताम तवली, गागेडे, साळुंकी साळकी, पिंगा, फस्ट पिंगा, गोफ इत्यादी खेळ रंगले. फुगड्यांमध्ये तर सिनेतारका आशा काळे स्वतः सहभागी झाल्या तेव्हा तर टाळ्यांचा कडकडाट झाला.