पुणे-मधूर भांडारकर दिग्दर्शित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित असलेल्या इंदू सरकार चित्रपटाला पुणे शहर काँग्रेसने विरोध करत आज (15 जुलै) पुणे शहरात होणारे त्याचे प्रमोशन हाणून पाडले. काँग्रेस नेत्यांना दाखविल्याशिवाय आणि त्यांच्या परवानगीशिवाय हा चित्रपट पुणे शहरात प्रदर्शित केल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व चित्रपटाचे प्रदर्शन रोखून धरतील, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला. परंतु मधूर भांडारकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेटावयास नकार दिल्याने आंदोलकानी नारेबाजीला सुरुवात केली होती. परंतु विनापरवानगी आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचे आंदोलन मोडीत काढले.
दिग्दर्शक मधुर भांडारकर त्यांच्या आगामी इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार अॅण्ड किचन या हॉटेलमध्ये दुपारी दीड पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करू शकतात हे लक्षात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द केली. त्यानंतर भांडारकर बावधानमधील सूर्यदत्ता इनस्टिट्यूटमधील पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधुर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवळील क्राऊन प्लाझा या ठिकाणी पोहोचले. या हॉटेलमधे तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे कळवण्यात आले. मात्र, त्या आधीच माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते क्राऊन प्लाझा हॉटेलमध्ये घुसले. त्यामुळे येथील पत्रकार परिषदही ही रद्द करण्यात आली.
Congress workers hv barged in the Hotel lobby & created ruckus,me & team are stranded like hostages in hotel room. #pune activity cancelled. pic.twitter.com/6GHX1VHGD8
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 15, 2017