कोथरूड मधील शिवसृष्टीच्या आणि मेट्रोच्या जागेबाबत प्रशासनाने अहवाल द्यावा -पालकमंत्री
पुणे :- शिवसृष्टीसाठी कोथरुड कचरा डेपोची जागा देणे शक्य न झाल्यास शेजारील बीडीपीची जागा अधिग्रहित करावी काय व त्याचा मोबदला कशाप्रकारे द्यावा याची माहिती तयार करून द्या, असा आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिला. या विषयावर आज विधानभवनात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
आयुक्त कुणाल कुमार, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संकल्पना तयार करणारे नितीन देसाई, यांनी एकत्रित चर्चा करुन शिवसृष्टीला किती जागा लागेल व त्यासाठी किती बांधकाम करावे लागेल याची विस्तृत माहिती द्यावी, असेही निर्देश श्री.बापट यांनी दिले.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी. भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ, नगर विकास सचिव नितीन करीर, मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ, भाजप गटनेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे अरविंद शिंदे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.
या जागेशेजारी वनविभागाची जागा आहे. ती पालिकेने ताब्यात घेऊन वन विभागास अन्यत्र जागा देता येईल काय ही शक्यता तपासून पाहण्याची सूचना बापट यांनी केली. त्यानुसार लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे प्रशासनावर सांगितले.