ऋतुप्रधान लोक संगीताच्या उपशास्रीय रचनांनी श्रोते मंत्र मुग्ध !
पुणे: ऋतुप्रधान लोक संगीताशी नातं सांगणार्या कजरी, चैती, होरी अशा ,गायिका अनुराधा पटवर्धन(पं संजीव शेंडे यांच्या शिष्या)यांनी सादर केलेल्या उपशास्रीय रचनांनी श्रोते मंत्र मुग्ध झाले. निमित्त होते भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेल्या ‘अनुबंध’ या कार्यक्रमाचे.
गेल्या अडिच वर्षा तील हा ८८वा सांस्कृतिक कार्यक्रम होता .
विविध ऋतू आणि उत्सवांच्या निमित्ताने , प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणी लोकसंगीताद्वारे गायिल्या जाणार्या रचना गायिका पटवर्धन यांनी यावेळी सादर केल्या.
ठुमरी क्वीन शोभा गुर्टू यांच्या स्मृति दिना निमित्त प्रथम मांज खमाज रागातील पारंपरिक कजरी ठुमरी सादर करून गुर्टू यांना आदरांजली वाहण्यात आली.
“बैरन रतियां कैसे आऊँ ?” ही दीपचंदी तालातील कजरी ठुमरी पटवर्धन यांनी गायली, त्यानंतर पारंपरिक लोकसंगीतातील मिश्र पिलू रागातील कजरी सादर झाली बोल होते “बरसन लागी सावन बूंदियां”.
यानंतर पटवर्धन यांनी त्यांचे गुरू पं संजीव शेंडे यांची मिश्र गारा रागातील रचना “सावनभादो में झुला झुले रे” सादर केली.
त्यानंतर सावनी शेंडे यांची राग मिश्र मांड मधील होरी या ऋतूवर अधारित “डारो ना रंग श्याम” ही रचना सादर केली
चैती पारंपरिक चाचर ताल मधील “चैतर चुनर रंगा दे हो रामा” , तसेच ‘पूरब धून’ मधली “सननन रात करे” अशा बहारदार लोकसंगीतातील रचना पटवर्धन यांनी सुरेल आवाजात सादर केल्या.
पारंपरिक बारहामासा रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या गीताचे बोल होते “नई झुलनीकी छैय्या”!
कार्यक्रमात गायिका अनुराधा यांना तबल्यावर केदार तळणीकर , व्हायोलिनवर निलिमा राडकर, व संवादिनीवर कुमार करंदीकर यांनी समर्पक साथ दिली. कार्यक्रमात रंजना काळे यांनी उत्तम निवेदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले.