बहिणाबाई चौधरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त सांगीतिक नृत्य सादरीकरण
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त ‘ परिमळ ‘ या सांगीतिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
तेजदिप्ती पावडे प्रस्तुत हा बहारदार कार्यक्रम शनीवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
कथा संकल्पना ,नृत्य दिग्दर्शन तेजदिप्ती पावडे यांचे होते . बहिणाबाई चौधरी यांच्या आयुष्याचा मागोवा या कार्यक्रमातून घेतला गेला. .
‘ मन वढाय, वढाय ‘, ‘गुढी पाडव्याचा सण , आता उभारारे गुढी ‘,अरे, संसार संसार ‘, ‘खोप्यामधी खोपा, सुगरणीचा खोपा ‘, ‘जाय आता पंढरीला ‘,’ आज माहेराला जाणं, झाली झाली गं पहाट ‘ बहिणाबाईंच्या अशा अनेक बहारदार कविता नृत्यासह नजाकतीने सादर झाल्या आणि रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
‘ बहिणाबाईंच्या काव्यातील भावनांचा शोध घेत आम्ही जळगाव जिल्हयात त्यांच्या गावी गेलो. दोन वर्षे तयारी करुन ‘ परिमळ ‘ हा सांगितिक नृत्य कार्यक्रम तयार केला . हा बहिणाबाई यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे’, असे मनोगत तेजदिप्ती पावडे यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८४ वा कार्यक्रम होता
संकेत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.