भारतीय विद्या भवनमध्ये गर्जले ‘ क्रांतीचे पोवाडे
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शाहिरांचे बोल खडे ,ऐका क्रांतीचे पोवाडे ‘ हा कार्यक्रम दि. ९ ऑगस्ट २०१९ रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित करण्यात आला होता. रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
‘ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ‘ आणि होनराजराजे प्रस्तुत या कार्यक्रमात शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकारी क्रांतिदिनाचे औचित्य साधून पोवाड्यांच्या विविध शाहिरी रचना सादर केल्या.त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर ,कवी वसंत बापट ,शाहीर समरेन्द्र ,शाहीर दादा कोंडके , शाहीर हेमंतराजे मावळे ,शाहीर महादेव नानिवडेकर यांच्या रचना सादर केल्या गेल्या .
अफजलखान वध ,१८५७ चे स्वातंत्र्यसमर ,पुण्याची निर्मिती ,शौर्याची परंपरा अशा अनेक विषयांवर हे पोवाडे होते.
पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘ भव्य दिव्य अशी ही, सांगीतो पुण्याची महती ‘ या पोवाड्यानेही रसिकांची दाद मिळवली.
गणाधिपतीला वंदन शाहीर दादा कोंडके लिखित गणाने करुन पोवाड्यांचा हा कार्यक्रम सुरु झाला. त्यात सर्व स्वातंत्र्यवीरांना नमन करण्यात आले.
संगीत संयोजन होनराजराजे मावळे यांचे होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्याचा पोवाडा सादर केला. ‘ गर्जली मराठी शाहिरी ‘ हा मुजराही शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सादर केला. शौर्य , परंपरेचे पोवाडे ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘ शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण ‘ या शब्दांची प्रचीती आली. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८१ वा कार्यक्रम होता.