कामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला !
पुणे :
लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड ) कंपनीतून बेकायदेशीरपणे नोकरीवरुन काढलेल्या २१ कामगारांना कामगार न्यायालयातील लढयात १६ वर्षांनी यश मिळाले आहे ! या कामगारांना कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश दिले आहेत . कामगारांच्या बाजूने लढा देणारे वकील अॅड. संतोष म्हस्के यांनी ही माहिती दिली.
लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड ) या कंपनीतील २१ कामगारांना कोणतेही कारण न देता नियमबाह्य रित्या कमी करण्यात आले होते. त्यांनी म्हस्के यांच्या मार्फत कामगार न्यायालयात धाव घेतली. १६ वर्ष चिवटपणे खटला लढल्यावर २६ जून रोजी निकाल कामगारांच्या बाजूने लागला.या निकालाची प्रत आज ९ जुलै रोजी प्राप्त झाली.
याबाबत अधिक माहिती अशी :या कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र लेबर युनियन शी संगनमत करून २१ कामगारांना १५ सप्टेंबर २००३ पासून नोकरीवरून कमी केले होते . या कामगारांना उपासमारीचे जीवन जगावे लागत होते . न्यायालयीन लढ्यासाठी खर्च करण्याची ताकदही त्यांच्यात उरली नव्हती . सामाजिक कार्यकर्ते एड . संतोष म्हस्के यांनी विना मानधन या कामगारांचा न्यायालयीन लढा सलग १६ वर्षे लढला . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या . मधुरा मुळीक यांनी कंपनीचा कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि अनुचित कामगार प्रथांचा ठरविला . सर्व २१ कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले .
या २१ कामगारांना कमी केल्याच्या दिवसापासून आजपर्यंतचे निम्मे वेतन ,अनुषंगिक आर्थिक फायदे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . कंपनी व्यवस्थापनास ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे . या दंडाची ५ हजार रुपये रक्कम कमी केलेल्या प्रत्येक कामगारास देण्याचा आदेशही दिला आहे . या निर्णयामुळे २१ कामगारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे .
कामगारांतर्फे एड . संतोष म्हस्के यांनी तर कंपनीतर्फे एड . मनीषा मोरे यांनी काम पाहिले .
|