डॉ.पी. ए. इनामदार यांना संचालकपदावरून दूर करण्याच्या निबंधक ( सहकारी संस्था ) यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
पुणे :डॉ.पी. ए. इनामदार यांना दि मुस्लीम को- ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दूर करण्याच्या निबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
निबंधक ( सहकारी संस्था ) यांनी १८ एप्रिल २०१९ रोजी मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांना संचालक पदावरुन काढून टाकण्याचे दिलेले आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. २५ एप्रिल २०१९ रोजी दिलेल्या आदेशाने स्थगित केले आहेत.
निबंधकांच्या आदेशाविरुद्ध डॉ.पी. ए. इनामदार यांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले होते. सहकारमंत्री हे निवडणुकीशी संबंधित कामात व्यग्र असल्याने या अपीलावर निर्णय घेऊ शकणार नाहीत, असे सांगण्यात आल्याने वरील रिट याचिका डॉ. इनामदार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.
या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सहकार मंत्र्यांनी त्यांच्यासमोरील अपीला चा निकाल एका महिन्याचा आत द्यायचा आहे.
सहकारमंत्र्यांचा निकाल डॉ.पी. ए. इनामदार यांच्या विरोधात गेल्यास त्या निकालाची अंमलबजावणी ही निकालाच्या दिनांकापासून १o दिवस अंमलात आणू नये, असाही आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे.
डॉ.पी. ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे आज ही माहिती दिली.