कौशल्ये प्रशिक्षणानंतर महिला स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतात : डॉ. हर्षा जोशी
पुणे :’नव्याने निर्माण होणाऱ्या सेवा आणि रोजगार संधी बाहेरच्यांच्या हाती देण्यापेक्षा स्थानिक ग्रामीण महिलांनी कौशल्ये प्रशिक्षणाद्वारे आत्मविश्वासपूर्वक हस्तगत कराव्यात ‘ असे आवाहन ‘अनुभूती ‘ संस्थेच्या संचालक हर्षा जोशी यांनी केले .
‘सिनर्जी फाउंडेशन ‘ आणि ‘अनुभूती सोशल एम्पॉवरमेंट एन्ड एज्युकेशनल फाउंडेशन ‘ संस्थेतर्फे सोमवारी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांसाठी
‘महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार मेळावा ‘ आयोजित करण्यात आले होते . हा मेळावा कॅस्युरीना हॉल ,कुरुंजी (ता . भोर ) येथे सोमवार,१० डिसेंबर रोजी ,सकाळी ११ ते २ या वेळेत झाला . ‘सिनर्जी फाउंडेशन ‘ चे राजेंद्र आवटे,मंदार देवगावकर , ‘अनुभूती ‘ संस्थेच्या डॉ . हर्षा जोशी ,माधुरी सुमंत ,स्मिता तळेले ,हर्षा रास्ते ,मिलिंद जोरी ,प्रशांत कोल्हे यांनी मार्गदर्शन केले . सरपंच अस्मिता गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य छाया मळेकर यावेळी उपस्थित होत्या
यावेळी बोलताना हर्षा जोशी यांनी सद्यस्थिती आणि महिलांना उपलब्ध कौशल्य विकास पर्यायांबद्दल मार्गदर्शन केले . त्या म्हणाल्या ,’ महिलांना चांगले प्रशिक्षण मिळाले ,तर त्या स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतात . त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज आहे . उत्तम प्रशिक्षणानेच हे काम होऊ शकते. त्यासाठी मार्केटिंग ची मदत अनुभूती आणि सिनर्जी तर्फे करण्यात येईल ‘
सिनर्जी फाउंडेशन ‘ चे राजेंद्र आवटे म्हणाले ,’ डोंगरी भागातील रिसॉर्ट आणि पर्यटन उद्योग पूर्णपणे महिला चालवू शकतात . आदरातिथ्य -हॉस्पिटॅलिटी उद्योगात अत्यंत चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत . पूर्णपणे महिलांनी चालवलेली रिसॉर्ट आता पुढे येत आहेत ,अशा वेळी चांगली कौशल्ये शिकणे ही उद्योगाची पहिली महत्वाची पायरी ठरू शकते .
पर्यटन ,सेंद्रिय शेती ,बागकाम ,खाद्यपदार्थ बनवणे ,हस्तकला -शिवणकला ,संगणक -मोबाईल दुरुस्ती या विषयांवर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले . ग्रामीण भागातील ९० महिला प्रशिक्षणाला उपस्थित होत्या . या महिलांचे विषयनिहाय विशेष प्रशिक्षण पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे