ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2018 चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान
पुणे: ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणारा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका , स्वर योगिनी डॉ.प्रभा अत्रे यांना
आज प्रदान करण्यात आला.
पंडीत शिवकुमार शर्मा (प्रसिद्ध संतूर वादक), पंडीत हरिप्रसाद चौरसिया (प्रसिद्ध बासरी वादक), उस्ताद अमजद अली खान या दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.
एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थी प्रभा अत्रे यांना गौरविण्यात आले.
या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्यसैनिकांना, कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या सैनिकांना आणि वीर पत्नीना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते गौरविण्यात आलेे.
यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, फुरबू रिंडॉल, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनीता अशोक कामटे (कै.अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दिनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश होता.
या प्रसंगी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक ,अयान अली बंगश, उद्योजक गजेंद्र पवार उपस्थित होते.
पुरस्काराचे यंदाचे 30 वे वर्ष आहे. पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्काराची निवड केली’,अशी माहिती पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविकात दिली तसेच ग्लोबल पुलोत्सव या आगामी उपक्रमाची माहिती दिली.
‘ संगीताने, श्रोत्यांनी मला ओळख दिली.पूर्णत्वाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साथ देणाऱ्या सर्वांची कृतज्ञ आहे. मी प्रस्तुतीकरणाचा वेगळा विचार केला.पुणेकरांना अभिमान वाटेल असं काही करायचं आहे. माझे गुरु सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर , किराणा घराणे यांचीही मी ऋणी आहे. संगीत शिक्षणाचा साकल्याने विचार व्हावा.रागसमय संकल्पनेचा विज्ञानाच्या कसोटीवर तपासावे. परंपरेला वर्तमानाचा संदर्भ लावला पाहिजे.पुण्यात गुरुकुल उभारण्याचा इच्छा आहे ‘ असे मनोगत डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले
अमजद अली खान म्हणाले, ‘ सर्व देशवासियांना प्रभा अत्रे यांनी गायकीने आनंद दिला आहे.किराणा घराण्यातील प्रत्येकाने स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवले आहे. ख्याल -ठुमरी दोन्हीवर प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन संगीत क्षेत्रातील व्यक्तीमत्वाचा सन्मान करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे.
पं. हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, ‘ प्रभा अत्रे यांचा खूप जुना परिचय आहे. तेव्हापासून मी त्यांचे अनुकरण ( फॉलो )करीत आलो आहे. अत्रे या गुणी कलाकार आहेत. आजचा सोहळा पाहून असे वाटले की हाच खराखुरा सन्मान आहे. मला का नाही मिळाला हा सन्मान. पुढील जन्म महाराष्ट्रात व्हावा, इथल्या मातीत संगीताचा सुगंध आहे ‘
पं.शिवकुमार शर्मा म्हणाले, ‘ मी आणि प्रभा अत्रे यांनी जम्मू रेडियोवर एकत्र गायन केले आहे. एका बिंदूपासून सुरुवात करुन प्रभा अत्रे आता समुद्र बनल्या आहेत. नाव झाल्यावर अनेक कलाकारांचे वर्तन बदलते , पण डॉ. प्रभा अत्रे बदलल्या नाहीत. त्या अद्भुत गायिका आहेतच, पण चिंतनशील तज्ज्ञ आहेत. त्यांच्या वयाच्या शतकपूर्तीचाही असाच दिमाखदार सोहळा व्हावा.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘ अत्रे घराण्याचा बहुआयामी , बंडखोर असण्याचा संबंध आहे, असे प्रभाताईंकडे पाहून वाटले. संगीताचा व्यामिश्र विचार प्रभाताई मांडतात, मैफीली गाजवतात. संगीताचे सर्व प्रकार त्यांनी गायले. संगीताने त्यांचे मन विशाल बनले आहे. परंपरेशी इमान राखून त्यांनी नवता अंगीकारली. साधनेचा उपयोजनाशी संबंध प्रभाताईंनी जोडला. घराण्याचा वृथा अभिमान न बाळगता एकत्र येऊन संगीत विचार केला पाहिजे , अशी भूमिका त्यांनी घेतली. संगीत अकादमीच्या माध्यमातून त्यांनी आणखी कार्य करावे. प्रभाताई पूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐवज आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.
सुरेश धर्मावत (काका) यांनी आभार मानले. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळात तर्फे महेश सूर्यवंशी यांनी ही गणेशमूर्ती देऊन डॉ. प्रभा अत्रे यांचा सन्मान केला.