पुणे : वडगांव शेेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे
भाजपा आमदार जगदिश मुळीक आणि बापूसाहेब पठारे मुंबईत मुख्यमंत्र्यांना रात्री भेटायला गेले .आणि तिथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते हा प्रवेश झाला.
वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीने सुनील टिंगरे याना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि सुनिल टिंगरे यांच्यात या मतदार संघात लढत होणार आहे. आता बाप्पू पठारे यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
या संदर्भात बोलताना पठारे म्हणाले की, मी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणली होती. मी माजी आमदार झाल्यापासून मला पक्षाने विचारले नाही. पाच वर्षात एका ही बैठकीला बोलवले नाही.
माझ्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे मी भाजप मध्ये जात आहे. पवार कुटुबांचा मला नेहमी आदर आहे. आता वडगाव शेरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी माझ्या सह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
पठारे हे प्रथम काॅंग्रेसमध्ये होते. 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. 2009 मध्ये ते आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुळीक यांच्याकडून पराभव झाला.
खराडी-चंदननगरमध्ये त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्याऐवजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारातही पठारे उतरले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अखेरीस घेतला. त्यांच्या पत्नी संजिला पठारे आणि पुतणे महेंद्र पठारे हे राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत.
पठारे यांचा प्रवेश भाजपसाठी वडगाव शेरीत `मास्टर स्ट्रोक` ठरला आहे. भाजपची आणखी ताकद वाढली आहे, अशी प्रतिक्रिया मुळीक यांनी दिली.
राष्ट्रवादीकडून सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे पठारे यांनी सांगितले. माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. भाजपमध्ये योग्य सन्मान देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. माझ्या भागाच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले