पुणे ता. २७ : पत्रकारितेतून यश शिखरावर पोहोचल्यानंतर जनसंपर्क व्यवसायात पदार्पण करून राजकीय रणनीतीकार म्हणून ख्याती प्राप्त केलेले सुनील माने आजपासून नवी इनिंग सुरु करत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने बहुआयामी व्यक्तिमत्वाची राजकारणात आज ‘एण्ट्री’ झाली आहे.असे मत संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले .यावेळी बापट यांच्या सह भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, सरचिटणीस उज्वल केसकर, मुरली मोहोळ आणि गणेश घोष यांच्या उपस्थितीत माने यांनी आज जंगली महाराज रस्त्यावरील भाजप शहर कार्यालयात पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी खासदार बापट म्हणाले की, सुनील माने यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करतोय. सुनील दैनिकात काम करत असल्यापासून आमचा परिचय असून पत्रकार नावाला शोभेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेत त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी वृत्त प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी समाजाला पुढे नेण्याचे काम केले. आज सुनील माने यांच्या रूपाने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता पक्षाला मिळाला असून त्याच्या व्यूहरचनेचा पक्षाला फायदा होईल, अशी खात्री वाटते.
मिसाळ म्हणाल्या की, खासदार बापट यांच्या समवेत अनेक निर्णायक प्रसंगांमध्ये सुनील माने यांना काम करताना मी जवळून पाहिले. ज्या एकनिष्ठेने आणि एकरुपतेने त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काम केले त्यावरून आम्ही तेव्हाच त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले होते. आजची केवळ औपचारिकता आपण पार पाडत आहोत, असे मला वाटते.
माने म्हणाले की, वीस वर्ष पत्रकारिता व यासंबंधी क्षेत्रात कामे केली. या दरम्यान विधानसभा ते संसद अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांचे व्हिजन आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीने मला प्रभावित केले. खासदार बापट यांच्या समवेत काम करत असताना सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते देशाला पुढे घेऊन जाण्याच्या ध्येयाने काम करत असल्याचे जाणवले. या विकास प्रक्रियेत आपल्यालाही अल्प वाटा देता यावा, या उद्देशाने मी आज भारतीय जनता पक्ष प्रवेश केला.
यावेळी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक विजय शेवाळे, आदित्य माळवे, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, प्रकाश ढोरे, सुशील मेंगडे, महेश लडकत, अजय खेडेकर, सम्राट थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, प्रतीक देसर्डा, सुनील शुक्ला,जतिन पांडे, चंद्रकांत पोटे,पुनीत जोशी,संजय मयेकर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, डॉ अंबरीश दरक,ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विनोद सातव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.