पुणे-
वाघोलीची सुनियोजित विकासाची वाटचाल करण्याच्या दिशेने तसेच वाघोलीत झपाट्याने
होणारे नागरीकरण पाहता वाघोली टीपी स्कीम प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक १४चा इरादा
पीएमआरडीएकडून जाहीर करण्यात आला आहे. वाघोली गावातून पुणे-अहमदनगर महामार्गाला जोडणारा व
११० मीटर रुंद रिंगरोड रस्त्यामुळे वाहतूक कोंडीतून लवकरच नागरिकांची सुटका होणार आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६०(१) नुसार पुणे महानगर
प्रदेशाकरिता मौजे वाघोली प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक १४ तयार करण्यासाठी इरादा जाहीर
करण्यात आला आहे. तसेच पुणे महानगर परिक्षेत्र १६६६ चे कलम ४० (१) अन्वये रस्ते व सार्वजनिक सोई
सुविधा व सुनियोजित विकास करण्यासाठी ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पुणे महानगर परिक्षेत्रातील उचित, सुनियोजित व जलद विकासाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सदर
परियोजना हाती घेण्यात आली आहे.
या भागात रांजणगाव औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने वाघोली टीपी स्कीममुळे
वाघोलीच्या विकासात भर पडणार आहे. या योजनेमुळे विभागामध्ये बदल होऊन कोणतेही अधिमुल्य न भरता
विकसनक्षम विभागातील जमीनमालकांना विकसित भूखंड प्राप्त होतो. तसेच कोणीही विस्थापित व भूमिहीन
न होता आवश्यक असणाऱ्या रस्ते, शाळा, दवाखाने, बगीचा, क्रीडांगणे, व इतर सार्वजनिक सुविधाकरिता
जमीन उपलब्ध होते. तसेच जमीनधारकाचे कोणतेही नुकसान न होता समान न्यायाने योग्य आकाराचे
जमिनीच्या मोबदल्यात नियमित आकारातील विकसित भूखंड मिळतात. प्रारूप नगररचना योजनेअंतर्गत
नागरिकांना सुनियोजित रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युतीकरण आदी सोईसुविधा
प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, ‘वाघोलीचे नागरीकरण झपाट्याने होत असल्याने टीपीस्कीममुळे
वाघोलीच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. तसेच ११० मीटर बाह्यवळण रुंद रस्त्यामुळे वाहतूक
कोंडीतून नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे.’