पुणे: महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपने अध्यक्ष पदासाठी सुनील कांबळे यांना आज उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे दाखल केला . तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्मिता कोंढरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थायी समिती मध्ये सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने सुनील कांबळे अध्यक्ष होणार आहेत. महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दि. 5 मार्चला निवडणूक होणार आहे. पालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपकडून ज्या सदस्याला उमेदवारी मिळणार, तोच अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित आहे.
हेमंत रासने ,उमेश गायकवाड आणि राजेंद्र शिळीमकर,दिलीप वेडे पाटील हे देखील अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजकल्याणमंत्री असलेल्या दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील यांना उमेदारी दिली .सुनील कांबळे हे पाचव्यांदा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले आहेत . यापूर्वी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहले आहे . या शिवाय ते गेली 2 वर्षे स्थायी समितीचे सदस्य होते. आज त्यांच्याबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, मावळते स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक,माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,शिवसेनेचे संजय भोसले,तसेच इच्छुक असलेले पण उमेदवारी न मिळालेले गायकवाड ,वेडेपाटील ,शिळीमकर यांच्या सह आरती कोंढरे ,रंजना टिळेकर,नाना भानगिरे,दीपक पोटे,विशाल धनवडे, आदी नगरसेवक उपस्थित होते .