पुणे महानगरपालिकेची स्थापना 15 फेब्रुवारी 1950 रोजी झाली आहे. शिवाजीनगर (मौजे भांबुर्डा) या ठिकाणी शिवाजी पुलालगत मुठा नदी काठी सुमारे साडेचार एकर जागेवर प्रशासकीय कामासाठी सुंदर दगडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या महानरपालिकेच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 1958 साली तत्कालिन उपराष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. या बांधकामामध्ये तळमजला अधिक 3 मजली 3 विंग्जच्या बांधकामाचा समावेश होता. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार महापालिकेच्या इमारतीमध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये पुन्हा एक वाढीव विंगचे बांधकाम 1990 साली करण्यात आले. तद्नंतर पुन्हा पार्किगसाठी पूर्व बाजूस स्वतंत्र पार्किंग तळमजला अधिक पहिला मजला (पार्ट) बांधकाम करण्यात आले.
सध्या पुणे महानगरपालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे 250 चौ. कि.मी असून नव्याने समाविष्ट 11 गावांसहीत क्षेत्र सुमारे 331 चौ. किमी इतके झाले आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे 40 लक्ष इतकी असून 167 नगरसेवक आहेत. वाढत्या लोकसंख्येचा कारभार त्या त्या भागातून चालण्याच्या दृष्टीने क्षेत्रिय स्तरावरील 15 क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने दैनंदिन साफसफाई, कचरा, वाहतूक, कर संकलन, विवाह नोंदणी, इत्यादी कामे तेथून केली जातात.
याच अनुषंगाने पुणे मनपाचा वाढलेला विस्तार विचारात घेऊन अस्तित्वातील इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात एका नवीन विस्तारीत इमारतीचे दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरूपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून वापरासाठी एकूण सुमारे अंदाजे 14 हजार चौ.मी. क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
Ø या मध्ये तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित असे नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, बँक ए.टी.एम, पीएमपीएमएल पास केंद्र इ. सुविधा करण्यात आल्या आहेत.
Ø पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत.
Ø दुस-या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्ष यांची दालने तसेच स्थायी समिती सभागृह इतर समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.
Ø तिस-या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभेच्या सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभेच्या सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभेच्या सभागृहासाठी, लोखंडी फ्रेम व जी.आर.सी. (ग्लास रिनर्फोर्स्ड कॉन्क्रीट) मटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची तळापासून सुमारे 60 फूट इतकी आहे. नवीन सभागृहामध्ये 224 सभासदांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये 180 नागरिकांकरीता आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांच्या डायसच्या मागील बाजूस 50 अधिकारी व त्या मजल्यावर सुमारे 50 पत्रकारांसाठी कक्षाची रचना केली आहे.
इमारतीसाठी अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, 6 उद्वाहने व वीजेची बचत होणारी एल.ई.डी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इमारतीचे बांधकाम हे पर्यावरण पुरक निकषांन्वये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टिम करण्यात आली आहे.
अशाप्रकारे विस्तीर्ण व्यासाचे घुमटाच्या आकाराचे सभागृह प्रथमच बांधण्यात आले असून हे वास्तुकलेचा उत्तम नमुना ठरणार आहे व त्यामुळे पुणे शहराच्या लौकीकात भर पडणार आहे.
आजपर्यंत या कामासाठी सुमारे 48.75 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.
या इमारतीचे बांधकाम सुमारे सव्वातीन वर्षात पूर्ण करण्यात आले असून यामुळे पुणे महानगरपालिकेस नवीन सुसज्ज वास्तू उपलब्ध झाली आहे.