पुणे- महापालिकेतील संभाव्य महापौर बदलानंतर म्हणजे साधारणतः २ महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने विरोधीपक्षनेता बदलासाठी तयारी केली असून धनकवडीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांची या पदावर वर्णी लागण्याची चिन्हे आहेत .
सध्या चेतन तुपे पाटील हे पालिकेतील विरोधीपक्षनेते आहेत.त्यांच्या आक्रमक पद्धतीने विरोधकांवर हल्ला करण्याच्या कामाबाबत पक्ष समाधानी असला तरी सभागृहातील एकंदरीत त्यांच्या ‘कार्यपद्धती ‘वर पूर्व भागातील काही नगरसेवक नाराज आहेत . आणि आगामी २०१९ च्या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेता बदलावा असाही विचार पुढे येतो आहे .यादृष्टीने माजी उपमहापौर दिलीप बराटे पाटील यांचेही नाव या पदासाठी पुढे येत आहे . पण एक वर्ष एक पद या तत्वाने बराटे यांना विरोधीपक्षनेता पद मिळणे मुश्कील मानले जाते आहे . कारण ते सध्या स्थायी समितीचे सदस्य आहेत . आणखी एक माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे नाव देखील या पदासाठी चर्चेत आहे . पण नुकतेच ते एका अडचणीत सापडले होते त्याचा फटका त्यांना बसेल असे सांगितले जाते . आणि खा. सुप्रिया सुळे या विशेषतः विशाल तांबे यांच्या नावासाठी आग्रही असतील असे दिसते आहे . या अनुषंगाने विशाल तांबे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेता पदाची माळ पडण्याची चिन्हे आहेत.