पुणे : अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यापुढे अंधारी आली आहे. वर्ष पुर्ण झाले तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करत आहेत अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली.उद्या राष्ट्रवादी , तसेच कॉंग्रेस आणि शिवसेना भाजपच्या सत्ताकाळातील अंधकारमय वर्ष म्हणून मोर्चा काढून निदर्शने करत आहेत या पार्श्वभूमीवर महापौरांनी त्यांचा सामना करणारे हे वक्तव्य आज पत्रकार परिषदेतून केले . वर्षपुर्तीनिमित्त महापौरांनी पत्रकारपरिषद घेतली .भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी यावेळी उपस्थित होते.
महापालिकेतील वर्षभराच्या सत्ताकाळात मागील पंधरा वर्षात झाली नाहीत तेवढी मोठी व महत्वाची कामे झाली आहे, असा दावा त्यांनी केला. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापालिकेत १५ मार्च २०१७ रोजी महापालिकेतील महापौर व अन्य सत्तापदे भारतीय जनता पार्टीने ग्रहण केली. मेट्रो, २४ तास पाणी योजना, नदीकाठ संवर्धन योजना, नदीसुधार योजना पहिल्याच वर्षात मार्गी लावल्याचे महापौरांनी सांगितले. तर मुरलीधर मोहोळ यांनी मिळकतकर देणाऱ्या कुटुंबप्रमुखासाठीची अपघात विमा योजना, वैद्यकीय तसेच परिचारिका महाविद्यालय या योजनांना गती दिल्याचे सांगितले . भिमाले यांनी मिळकत कर विभागाचे उत्पन्न जीआयएस यंत्रणेमुळे वाढले असल्याचा दावा केला. कॅन्सरमुक्त पुणे, लहूजी वस्ताद स्मारक, शिवसृष्टी या योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश मुळीक यांनी आगामी वर्षात या सर्व योजना पुर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.
शहराध्यक्ष गोगावले यांनी पक्षाचे काम महापालिकेत जाहिरनाम्यानुसार सुरू असल्याचे सांगितले.
शिवसृष्टी बीडीपीत होणार आहेच एवढेच नव्हे तर संपुर्ण शहराच्या बीडीपी धोरणाविषयी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आमदार, खासदार यांनाही त्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात चर्चा होईल व नंतर मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल असे भिमाले यांनीयावेळी स्पष्ट केले .