पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अखेर आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केल्यानंतर आज मुळीक यांनी आपले 2 उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे सादर केले .या वेळी आमदार मुळीक, महापौर मुक्ता टिळक ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,वर्षा तापकीर,सुनील कांबळे,राजेंद्र शिळीमकर ,गोपाळ चिंतल,उमेश गायकवाड, डॉ.भरत वैरागे आदी उपस्थित होते . येत्या सात मार्चला मुळीक यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल.त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नीलिमा खाडे, उमेश गायकवाड तर अनुमोदक म्हणून रंजना टिळेकर ,मंजुषा नागपुरे यांच्या सह्याआहेत .कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी च्या वतीने नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे . त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . मात्र निवडून येण्या पुरते संख्याबळ विरोधकांकडे नाही .यावेळी त्यांच्यासमवेत चेतन तुपे पाटील ,अरविंद शिंदे, बंडू गायकवाड आदी उपस्थित होते .
भाजपातून सलग पाचवेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा डावलण्यात आले आहे. गेल्यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी तर यावेळी योगेश मुळीक यांच्यासाठी कांबळे यांना दूर ठेवण्यात आले.तर आमदार योगेश टिळेकर यांच्या मातु:श्री रंजना टिळेकर यांचेही नाव चर्चेत होते.सुनील कांबळे हे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू असले तरी नगरसेवकपदाची ही त्यांची पाचवी टर्म आहे. दिलीप कांबळे यांच्या आधीपासून ते महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. दोन्ही आमदारांनी आपले बंधू व आईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता .
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून जगदीश मुळीक निवडून आले आहेत. या मतदारसंघावरील पकड मजबूत करण्यासाठी योगेश यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आल्याचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी संकेत दिले आहेत .