पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्याअध्यक्षपदासाठी यावेळी कोणाला संधी द्यायची या नावावर मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार संजय काकडे यांनी निर्णय निश्चित केल्याचे वृत्त आहे . दरम्यान काल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , पालकमंत्री गिरीश बापट , भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले एकत्र असूनही या विषयावर त्यांनी आपसात काही चर्चा केली किंवा कसे याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही .दरम्यान स्थायीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी नगरसेवक सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांनी नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. त्यामुळे ..कौन बनेगा चेअरमन .. याबाबत आता महापालिकेच्या वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे .
भाजपा मधील इच्छुक 24 नावांमधून अंतीम चार नावे निवडताना शहराध्यक्ष गोगावले यांना मोठी कसरत करावी लागते आहे. त्यातच काही जणांनी नेत्यांमार्फत दबाव आणण्यास सुरवात केली आहे. रिक्त झालेल्या एकूण आठ नव्या जागा भरल्या जाणार असून त्यात भाजप चार, राष्ट्रवादी दोन, कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
भाजपच्या नावामध्ये सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, हेमंत रासने, माधुरी सहस्त्रबुद्धे, मानसी देशपांडे, राणी भोसले, स्मिता वस्ते, कविता वैरागे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा आहे.
कांबळे व रासने यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद हवे असल्याने त्यांनी तशी तयारी सुरू ठेवली आहे.स्थायी समितीचे अध्यक्षपद महिला सदस्याला द्यावे त्यासाठी मंजुषा नागपुरे यांनी मोहीम आखली आहे .
शिवसेनेच्या वाट्याच्या एका जागेसाठी बाळा ओसवाल, नाना भानगिरे, संगिता ठोसर हे इच्छुक आहेत.. राष्ट्रवादीकडे देखील दोन जागा असून यावर तब्बल 25 जणांनी दावा केला आहे.
स्थायी समिती म्हणजे महापालिका तिजोरीच्या चाव्या असे समीकरण आहे . या दृष्टीने स्थायी समिती साठी आता इच्छुकांनी जोरदार मोहीम सुरु केली आहे .