पुणे-वेगवेगळी पारितोषिके घेवून स्वतःला नामांकित महापालिका म्हणवून घेणाऱ्या पुणे महापालिकेचा एक वेगळा चेहरा समोर येत आहे … ज्यामुळे गरजू तरुणांना ‘बोगस कर्मचारी ‘बनविणारी महापालिका अशी प्रतिमा या महापालिकेची बनणार आहे .
गेल्या वर्षी माय मराठी ने मिळकत कर विभागात पकडलेल्या तोतया कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ..बोगस कर्मचाऱ्यांच्या पुढील शोध मोहिमेत आणखी धक्कादायी माहिती पुढे येत आहे . या प्रकरणी अपराधी कोण ? असा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा प्रशासनातील बड्या बड्या अधिकाऱ्यांकडे बोटे दाखविली जाणार आहेत . काल ‘मायमराठी’ ने अशा महापालिकेतील ७८ ‘तथाकथित बोगस’ कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतरही आज १५ जाने.२०१८ रोजी बिनदिक्कतपणे महापालिका प्रशासन याच बोगस कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेताना दिसून आले. हे स्पष्ट व्हावे म्हणून सत्ताधारी भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी आज भूमी जिंदगी खात्यात काम करणाऱ्या एका बोगस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश माय मराठी च्या कॅमेऱ्यापुढे केला .
गेल्या वर्षी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि अविनाश बागवे यांनी आणि माय मराठी ने केलेल्या धडक कारवाईत एक बोगस कर्मचारी पकडला गेला .ज्याच्यावर महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला. आणि त्यानंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून ज्या व्यक्ती अधिकृतपणे महापालिकेच्या सेवेत नाहीत अशा व्यक्तींना महापालिकेच्या फाईल्स,संगणक आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खुर्च्या वापरू देवू नयेत ,असे आदेश सर्व खातेप्रमुखांना दिले होते .या शिवाय सुरक्षा विभागाने महापालिकेची सर्व दरवाजे बंद करून केवळ एकगेट प्रवेशासाठी आणि एक गेट बाहेर पडण्यासाठी निश्चित करून तातडीने अंमलबजावणी केली . नगरसेवक ,पालिकेचे सेवक,अधिकारी यांच्या व्यतरिक्त जे कोणी पालिकेत येतील अशा सर्व नागरिकांची प्रवेशद्वारावर नोंद ठेवून पालिकेत प्रवेश दिला जावू लागला .
पण सध्या तरी हा सर्व देखावाच असल्याचे निष्पन्न झाले आहे .मिळकत कर विभागात गेल्या वर्षी एक ‘बोगस ‘कर्मचारी पकडूनही अन्य ‘बोगस’ कर्मचाऱ्यांचा कारभार व्यवस्थित सुरूच राहिला हे विशेष . अशा बोगस कर्मचाऱ्यांची संख्या ७८ असल्याचे निष्पन्न झाले . नियुक्ती पत्र नाही , ओळखपत्र नाही ,अधिकृत पगार नाही अशा अवस्थेत हि तरुणाई महापालिकेत काम करत राहिली .
याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर असे निष्पन्न झाले कि हि तरुणाई पूर्वी स्मार्ट नावाच्या संस्थेमार्फत महापालिकेत विशिष्ट काळापुरती कामावर ठेवण्यात आली होती . हि कालमर्यादा संपल्यानंतर त्यांना कामावरून कागदोपत्री काढून टाकण्यात आले . पण प्रत्यक्षात हि तरुणाई आहे तशीच काम करत राहिली ,ज्यांना पगार महापालिका नव्हे तर अधिकारी ,आणि ठेकेदार यांच्यामार्फत दिला जातो .
बोगस कर्मचारी म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसतो आहे अशा ७८ तरुणांची महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गेली वर्षभरापासून ‘स्मार्ट’ फसवणूक होत असल्याचे आणि सर्व कामगार कायदे धाब्यावर बसवून महापालिका प्रशासनानेच हे ७८ कर्मचारी बेकायदेशीर रित्या महापालिकेत कामावर ठेवले असून त्यांचा वापर करून घेत असल्याचे दिसते आहे .विशेष म्हणजे ज्यांनी कामगार कायदे पाळायचे आणि उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष ठेवायचे अशा सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे सर्रास डोळेझाक चालविली हि आणखी मोठी धक्कादायी बाब आहे .