पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत महापालिकेच्या मुख्य सभेत आज सर्वपक्षीयांनी नाराजी ,निषेधाचे सूर आळवल्यानंतर १३५ धार्मिक स्थळांना आपण नियमित करून अभय देत आहोत ,६१ धार्मिक स्थळांचे स्थलांतर करून त्यांना नियमित करण्याचा प्रयत्न करत आहोत ,मात्र तरीही ५४२ धार्मिकस्थळे अशी आहेत कि ज्यांना आपण नियमित करू शकत नाही , आणि पुणे महापालिकेचे प्रशासन हे त्यांच्या विरोधात नाही पण सर्वोच्च न्यायालयाने हि कारवाई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली करण्यास आदेश दिल्याने न्यायालय आणि गृह विभाग सातत्याने याबाबत पाठपुरावा करत असल्याने आपणास कारवाई करावी लागते आहे असे आज महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले . त्यानंतर महापौर मुक्ता टिळकांनी मात्र हे ५४२ धार्मिक स्थळे सुद्धा इतरत्र जागा देवून वसविता येतील काय ? ती वाचविता कशी येतील याबाबत गटनेत्यांची आणि प्रशासनाची एकत्र बैठक आपल्या दालनात घेऊन यावर निर्णय घेवू असे सांगितल्यावर आज मुख्य सभेत या विषयावर पडदा पडला.