पुणे-विजय निश्चित झाल्यानंतर आता गद्दार कोण आहे ते स्पष्ट झाले आहे, असा टोला भाजप पुरस्कृत उमेदवार आगामी महापौर रेश्मा भोसले यांनी अजित पवार यांना लगावला.
पत्नी रेश्मा भोसले यांच्यासाठी आमदार अनिल भोसले यांनी राष्ट्रवादीकडे प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणुकीचे तिकीट मागितले होते. मात्र राष्ट्रवादीने तिकिट नाकारल्यानंतर भोसले यांनी ऐनवेळी भाजपकडून रेश्मा यांच्यासाठी तिकिट खेचून आणले होते.
मात्र, अखेरच्या दिवशी फॉर्म भरण्यात झालेल्या गोंधळामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश मिळाल्यानंतर अखेरीस त्यांना अपक्ष व भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले.
‘गद्दार शब्दालाही लाजवेल’, अशा वाक्यात अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली होती. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज जनतेने भरघोस मते देऊन त्यांचा विजय निश्चित केला. विजय निश्चितीनंतर रेश्मा भोसले यांनी आता गद्दार कोण आहे ते स्पष्ट झाले आहे, अशी तिखट टीका केली.