पुणे – महानगपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसचिवांकडे अर्ज दाखल करण्यात आले. यासाठी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी नगरसचिव सुनिल पारखी यांच्याकडे अर्ज सादर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीच्यावतीने नगरसेविका रेखा टिंगरे यांनीही अर्ज सादर केला. येत्या दि. २९ मार्च रोजी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुका होणार आहेत. नुकतेच जाहीर झालेले स्थायी समितीचे बलाबल पाहता स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपचे १० सदस्य, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १, शिवसेना १ असे आहे. त्यामुळे भाजपच्या मुरली मोहोळ यांचा विजय जवळजवळ निश्चितच मानला जात आहे.
महापौर व उपमहापौर निवडीत शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, आता ते कोणाबरोबर जाणार हे पाहावे लागणार आहे. परंतु, शिवसेनेच्या भूमिकेवर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक अवलंबून राहणार नाही हे ही तितकेच स्पष्ट आहे.