अजित पवारांकडूनच सत्तेचा गैरवापर; गोपीनाथ मुंडेंवर लाठी हल्ला व मावळच्या शेतकऱ्यांवर गोळीबार-खा. संजय काकडेंचा अजित पवारांवर प्रतिहल्ला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सत्तेचा गैरवापर केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर लाठीहल्ला करून त्यांचा हात फ्रॅक्चर करण्यापासून ते मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यापर्यंत अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर केला. गोपीनाथ मुंडेंचे घर फोडून धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणले… ही अशी कुणाचीही घरं फोडण्यासाठी भाजपने सत्तेचा वापर केलेला नाही. त्यामुळं भाजपवर आरोप करताना अजित पवार यांनी स्वतःचा व पक्षाचा भूतकाळ आठवावा, अशा तीव्र शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला चढविला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केल्याच्या विधानावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय काकडे यांना त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता खासदार काकडे पुण्यात बोलताना अजित पवारांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. खासदार काकडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळातच दुसऱ्या पक्षातील आमदार व नेते फुटून तयार झालेला पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची सत्ता असताना छगन भुजबळ, गणेश नाईक, धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांना त्यांनी दुसऱ्या पक्षातूनच घेतले. एक-दोन नेते सोडले तर, इतरांना त्यांनी पक्षात घेऊन त्यांना झिरो करून टाकले. तसेच, नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास व काँग्रेसमध्ये जाण्यास राष्ट्रवादीनेच बळ दिले हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता त्यांचे भविष्य हे पूर्णपणे अंधारमय दिसत असल्याने असे काही आरोप करून उजेडात येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु, त्याला आम्ही फारसे गांभिर्याने घेत नाही. मात्र, अजित पवारांनी भाजपवर टीका करताना त्यांचा भूतकाळ कायम स्मरणामध्ये ठेवावा ही अपेक्षा आहे.
महायुतीला 235 ते 240 जागा मिळतील;
शिवसेनेनं वाटाघाटी करताना वस्तुस्थिती लक्षात ठेवावी!
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. ते कोणामुळे निवडून आलेत हे शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावेळी लक्षात ठेवावं. शिवसेनेबरोबरील युती अभेद्य आहे व युतीचा पुढील निर्णय हा सर्वस्वी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होत असतो. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सहा महिन्यांपासून तयारी सुरू आहे आणि लोकसभेचे निकाल पाहता महाराष्ट्रात आम्हाला 235 ते 240 जागा नक्की मिळतील, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी पार पाडणार!
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खासदार संजय काकडे हे भाजपचे अधिकृत सदस्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याविषयी विचारले असता, प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वस्तुस्थिती मांडली होती. इतर सहयोगी पक्षांप्रमाणे मीदेखील भाजपचा सहयोगी सदस्य आहे. परंतु, आपण लवकरच भाजपचे अधिकृत सदस्यत्व घेणार आहोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी आपण पार पाडणार आहोत, असेही खासदार काकडे यावेळी म्हणाले.