लंडन – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला मंगळवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. 13 हजार कोटींचे कर्ज घेण्यासाठी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांनी बनावट गॅरंटी आणि खोटी कागदपत्रे दाखल केली होती. हे दोघेही गतवर्षी जानेवारीत भारत सोडून पसार झाले. नीरव मोदी नुकताच दोन वेळा लंडनमध्ये फिरताना दिसून आला होता. भारताच्या विनंतीनंतर त्याच्याविरुद्ध लंडन कोर्टाने अटक वॉरंट जारी केला होता. इंग्लंडमधील माध्यमांच्या माहितीनुसार, नीरवने पुन्हा हिऱ्याचा व्यापार सुरू केला आहे. त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले.
नीरव मोदीला आजच जामीन मिळण्याची शक्यता आहे. यानंतर त्याचा खटला सुद्धा विजय माल्ल्यासारखाच चालवला जाईल. हजारो कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये फरार झालेल्या विजय माल्ल्याला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याला जामीन मंजूर झाला होता. माल्ल्याला अशा स्वरुपाची अटक आणि जामीन दोन वेळा मिळाले आहेत.
मुंबईच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदीची पत्नी अमी मोदी विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 3 कोटी डॉलर ट्रान्सफर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेच्या खात्याचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हे पैसे बँकेतून घेण्यात आलेल्या कर्जाचे असल्याचा संशय आहे. या पैशातून न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये मोदीने एक मालमत्ता खरेदी केली होती.