पुणे- येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक होते आहे , तत्पूर्वी २२ एप्रिल रोजी पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाची नव्या अध्यक्षपदा च्या निवडीकरिता बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीत सर्वानुमते ‘पुणे शहराध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार अजितदादा आणि खुद्द शरद पवार यांना देण्यात यावेत ‘ असा ठराव संमत करून तो पाठविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर शहराचा अध्यक्ष घोषित होईल असे ही स्पष्ट चित्र आहे .
दरम्यान शहर अध्यक्ष पदासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर ,प्रशांत जगताप ,सुभाष जगताप ,रुपाली चाकणकर, रवींद्र माळवदकर यांच्यासह माजी महापौर अंकुश काकडे यांचेही नाव चर्चेत आहे .
शहराध्यक्ष आणि आगामी लोकसभा , विधानसभा निवडणूक यांची सांगड घालण्याचा देखील काही जण प्रयत्न करीत आहेत . शहराला कार्यकर्त्यांची फौज सांभाळणाऱ्या , खमक्या नेतृत्वाची गरज आहे असे म्हणताना मानकर यांचे नाव आघाडीवर घेतले जाते . पण हीच ताकद अजित दादा लोकसभेसाठी वापरतील कि अध्यक्ष पदासाठी असा हि प्रश्न या पार्श्वभूमीवर विचारला जातो आहे . सुभाष जगताप यांचे नाव ही आघाडीवर आहे मात्र नुकत्याच एका वैयक्तिक कारणात ते ग्रस्त झाल्याने त्यांचे नाव पिछाडीवर जाण्याची शक्यता अनेकजण व्यक्त करीत आहेत .
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच लोकसभा लढवेल असा पवित्रा घेतल्यानंतर अनेकांच्या नजरा मानकर यांच्याकडे वळल्या आहेत .तर सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजित दादा धक्का तंत्र वापरण्याची जास्त शक्यता आहे ते अचानकपणे नवा चेहरा लोकसभेच्या लढाईसाठी पुढे करतील असे सांगितले जाते .