सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सुदुंबरे गावातील योजनांचा लोकार्पण सोहळा
पुणे :
खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी सांसद आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या सुदूंबरे गावातील योजनांचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते बुधवार, दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे येथे या लोकार्पण समारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी संजीवनी जोगळेकर (सुदुंबरे गावाच्या प्रमुख समन्वयक) उपस्थित होत्या.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अॅड. वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे(मावळ), आमदार संजय भेगडे (मावळ), विश्वासराव देवकाते (अध्यक्ष जिल्हा परिषद, पुणे), गुलाबराव म्हाळसकर (सभापती, पंचायत समिती, मावळ), शांताराम कदम (उपसभापती, पंचायत समिती, मावळ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सौरभ राव (जिल्हाधिकारी), सुभाष भागडे (उपविभागीय अधिकारी मावळ), दौलत देसाई (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे) उपस्थित असणार आहेत.
सुदुंबरे गावाच्या विकास कामांची माहिती देताना वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘ग्राम विकास योजनेअंतर्गत ग्रामस्वच्छता, पर्यावरणपूरक गाव यांचे महत्व लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिक्षण व प्रौढ शिक्षण यांचा समावेश होता.
सायन्स टेक्नॉलॉजी विभाग, पुणे विद्यापीठ, यांनी जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबईमार्फत स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरो प्लाँट दिला आहे. यामार्फत गावाला स्वच्छ व सुंदर पाणी मिळत आहे त्यामुळे गावाच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांमधील गावापासून भंडारा डोंगरापर्यंत जाणारा रस्ता तसेच शालेय इमारत या गोष्टींची पूर्तता झालेली आहे. विकासकामात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहे. या सर्वांचा मिळून लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे.