पुणे: देशाच्या वीजक्षेत्रातील काही बदलांमुळे महावितरणवर सद्यस्थितीत आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी एकदिलाने व एकजुटीने काम करावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी शनिवारी (दि. 14) केले.
सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनच्या (एसईए) 44 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी स्टेडीयम येथे झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. संजीव कुमार बोलत होते. यावेळी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, महानिर्मितीचे संचालक (संचालन) श्री. चंद्गकांत थोटवे, महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. रवींद्ग चव्हाण, एसईएचे अध्यक्ष श्री. संजय ठाकूर, सरचिटणीस श्री. सुनील जगताप, एसईएचे सर्वश्री आबासाहेब मोराळे, अशोक गडदे, हनुमंत मोरे, अतुल देशपांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
श्री. संजीव कुमार म्हणाले, की आर्थिक प्रतिकुलता ही व्यवस्थापन, अधिकारी किंवा कर्मचार्यांमुळे आलेली नाही तर महावितरणच्या नियंत्रणाबाहेरील व देशातील वीजक्षेत्राच्या परिस्थितीत होत असलेल्या बदलांमुळे आलेली आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचार्यांना एक कुटुंब म्हणून या संकटातून बाहेर पडण्यासाठी एकजुटीने व ध्येयाने प्रयत्न करावे लागणार आहेत. उत्कृष्ट ग्राहकसेवेसोबतच नवीन वीजजोडण्या तात्काळ देणे, देयकांची नियमित व थकबाकी वसुल करणे आदींना प्राथमिकता द्यावी लागणार आहे. महावितरणने अंतर्गत कामकाजासाठी तयार केलेल्या मोबाईल अॅप्समुळे मीटर रिडींग, नवीन वीजजोडणी तसेच इतर ग्राहकसेवा वेगवान झाल्याचे व वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अॅपमुळे महावितरणची सेवा सुलभपणे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शेतकरी बांधवांना शेतीच्या सिंचनासाठी 8 ते 12 तासांपर्यंत कृषीपंपांना वीजपुरवठा उपलब्ध देण्यात आला. हा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जळालेले व नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी महावितरणकडून पूर्वनियोजनासह तातडीने कार्यवाही करण्यात आली. याकामी अभियंत्यांनी उल्लेखनीय काम केल्याचे मत श्री. संजीव कुमार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात एसईएचे सरचिटणीस श्री. सुनील जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशन आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. हनुमंत मोरे यांनी प्रास्ताविक केले तर श्री. अनिल वर्पे व सौ. मृदुला शिवदे यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, श्री. नागनाथ इरवाडकर यांच्यासह अधीक्षक अभियंते तसेच राज्यभरातून आलेले सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.