पुणे : विविध ग्राहकसेवा ‘एसएमएस’द्वारे देण्यासाठी पुणे परिमंडलातील आतापर्यंत 11,04,794 वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडून नोंदणी करण्यात आली आहे. वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यानंतर वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा बंद असल्याचा कालावधी किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.
पुणे परिमंडलातील सुमारे 26 लाख 22 हजारपैकी आतापर्यंत 11 लाख 4 हजार वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करण्यात आलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्गात वीजबिल भरताना मोबाईल क्रमांकाची माहिती घेण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी वीजग्राहकांकडे जाऊन मोबाईल क्रमांक व ग्राहक क्रमांकाची माहिती नोंदवून घेत आहेत. वीजग्राहकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सोबतच महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःचा इमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी 9225592255 क्रमांकाला MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक)(वीजग्राहकाचा इमेल) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास इमेल आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय 24×7 सुरु असणार्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18002003435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. व www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.