महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची कर्तव्य फाउंडेशनची मागणी
पुणे-महावितरण कंपनीचे वाडीया काँलेजजवळ असलेले वाडीया उपविभागीय कार्यालय हडपसर औद्योगिक वसाहत येथे स्थलांतरित करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना दूरवर जाण्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने या कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्यात यावे अशी मागणी कर्तव्य फाउंडेशनतर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता(प्रशासन) बा.भा.हळनोर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, माजी. नगरसेवक शैलेंद्र बिडकर, अशोक देशमुख, सचिन कांबळे, गणेश शेलार, सुनील बाथम उपस्थित होते.
सध्याच्या वाडीया उपविभागात बोट क्लब रोड,कोरेगाव पार्क व जे.जे.गार्डन हे तीन सेक्शन येतात त्याअंतर्गत पुणे स्टेशन, पुणे कँम्प परिसर, ताडीवाला रोड,कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड, बंडगार्डन, वाडिया काँलेज, जीपीओ, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे पोलीस आयुक्तालय, सेंट्रल बिल्डिंग, क्वीन्स गार्डन, गवळीवाडा, भिमपुरा आदी परिसराचा समावेश होतो त्यात सोसायटी, वस्ती ,झोपडपट्टी सोबतच बहुतांश सरकारी कार्यालये व निवासस्थान आहेत. या भागात महावितरणचे ४० हजार हून अधिक आहेत.या ग्राहकांना नवीन वीजजोड, वीज बील दुरूस्ती, वीज तक्रार, वीज बिल भरणा, मीटर दुरुस्ती आदी कामांसाठी मध्यवर्ती ठीकाणी असलेल्या वाडीया उपविभागीय कार्यालयात यावे लागते.या स्थलांतरामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असून वेळ व प्रवास खर्चही वाढणार आहे त्यामुळे सदर स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली असल्याचे विकास भांबुरे यांनी सांगितले तर कार्यकारी अभियंता बा.भा.हळनोर यांनी याबाबतीत नागरि हिताचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.