पुणे, १५ एप्रिलः बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, तांत्रिक कौशल्य, एकाग्रता, अचूक व तत्काळ निर्णय क्षमता, चिकाटी, साहस आणि संयम या सारखे गुण एरोमॉडलिंगच्या छंदामुळे मुलांमध्ये वृद्धिंगत होतात. भविष्यात जर देशाला चांगले पायलट हवे असतील तर शासनाने एरोमॉडेलिंगला मदत व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. असे मत एरोमॉडेलर सदानंद काळे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती गुरुकुलातर्फे हनुमंतवाडी, केळगांव, आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या‘एरोमॉडेलिंग शो’प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, आळंदी येथील गुरुकुलाचे प्राचार्य अशोक जैन, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, उद्योगपती हरीभाई शाह, मनोज वाडेकर, दिलीप दलाल व सौ. उर्मिला विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
सदानंद काळे म्हणाले, वर्तमानकाळात हवाई विज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. शासकीय व खाजगी क्षेत्रात तरूण उत्तम प्रकारे करियर करु शकतात. प्राथमिक शिक्षणापासून विमानाच्या सहवासात असणार्यांना भविष्यात एरो इंजिनियर व पायलट होण्यास मदत होईल. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स व रशिया इ. देशात विमान बनविणे व उडविणे हा छंद जोपासला जातो. तेथे एरोमॉडेलिंगच्या स्पर्धा होतात. त्यात लहानांपासून सर्व वयोगटातील लोक सहभागी होतात. तसेच, एरोमॉडेलर्सना स्टेडियम उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे. याच्या प्रसारासाठी प्रत्येक शहरात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एरोमॉडेलिंग क्लब स्थापन व्हावेत.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विमान उड्डाणाची आवड निर्माण व्हावी व त्यातील विज्ञान समजून दयावे, यासाठी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती गुरुकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येणार आहे. येथून नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करणारे विद्यार्थी बाहेर पडतील.
अशोक जैन म्हणाले, या शाळेत विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना चारित्र्यवान व शिस्तबद्ध बनविण्यावर आमचा अधिक कल असेल. जीवनात साहसी बनण्यासाठी त्यांना दिलेल्या अशा शिक्षणाचा खूप उपयोग होईल. मानवतावादी नवी पिढी निर्माण करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर देण्यात येईल.
साधारणपेण मोठ्या शहरांमध्ये एरोमॉडेलिंग शो चे स्पेशल स्टंट पहावयास मिळतात, परंतू या वेळेस आळंदी स्थित हनुमंतवाडी, केळगांव येथील गुरुकुलात आयोजित एरोमॉडेलिंग शोमध्ये छोट्या हवाई जहाज (एरोमॉडेल्स) च्या कसरती पहावयास मिळाले. येथे २ फूटाचे छोटे एरोमॉडेल्सपासून १० फूटाचे एरोमॉडेल्सने चित्तथराक कसरती सादर केले. या शो ची विशेषता ही होती की येथे ३० सीसी पासून १५० सीसी पर्यंतचे एरोमॉडेल्सचा सहभाग झाला होता. त्यामध्ये जेट हवाई जहाज पासून कित्येक मॉडेल्सचे हवाई जहाजाचे चित्तथराक कसरती पहावयास मिळाले. हे सर्व हवाई जहाज रेडिओ कंट्रोलच्या माध्यमातून उडविण्यात आले.
एरोमॉडेलिंग शो प्रसंगी विविध प्रकारची विमाने व हेलिकॉप्टर्सनी उड्डान करून अनेक कसरती सादर केल्या. ‘स्वस्तिक’नावाच्या ग्लायडर ने आकाशात प्रथम झेप घेतली. बलसा लाकडापासून तयार केलेले ‘जेनी’विमान व दोन पंखांचे ‘बायप्लेन’,‘स्टींगरे’या विमानाने केलेल्या व्हर्टिकल रोल मध्ये एअरफोर्स सारख्या कसरतीला प्रेक्षकांनी उदंड दाद दिली. थर्माकोलपासून विकसित केलेली ‘उडती तबकडी’ आकाशात झेपावली. ‘हेलिकॉप्टर’ ने अनेक पलट्या व कोलांटयाउडया घेवून आकाशात बहारदार सादरीकरण केले.
यानंतर विश्वशांती गुरुकुलाचा लोगो बरोबर घेवून दहा फुटी ‘टेलीमास्टर’ विमानाने आकाशात उंच झेप घेऊन हवाई पुष्पवृष्ठी केली. एरियल फोटोग्राफीसाठी सुद्धा हे विमान वापरले जाते. आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रगत फायटर प्लेन म्हणून ओळख असलेल्या ‘सुखोई’ व ‘तेजस’ या विमानांच्या प्रतिकृती असलेल्या विमानांनी उड्डान घेत केलेल्या विविध प्रकारच्या कसरती अक्षय काळे व अथर्व काळे या बंधूंनी सादर केल्या. ‘फ्लाईंग ईगल’,‘एनफोर्सर फ्लाईंग ईगल’,‘थ्रीडी’इ. विमानांनी चित्तथरारक कसरती सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या शो प्रसंगी विविध प्रकारच्या विमानांनी केलेल्या कसरती विद्यार्थी व नागरिकांसाठी पर्वणीच ठरल्या.
एरोमॉडेलर सदानंद काळे यांनी एरोमॉडेलिंग शोचे धावते समालोचन केले. या शोमध्ये अक्षय काळे व अथर्व काळे, रवि किरण घैसास व यश जहागिरदार यांनी वरील सर्व एरोमॉडेल्स रिमोट कंट्रोलने उडविली. येथे शालेय व महाविद्यालयाीन विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.