मुंबई- राष्ट्रवादीचे सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह पाटील यांच्या आशीर्वादाने रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच माढ्यात भाजपचाच खासदार होईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुढील चर्चा आम्ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत करून असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कविर्तक लढविले जात आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत केले. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मोहिते-पाटील घराण्याशिवाय महाराष्ट्राच राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. याच मोहिते-पाटील घराण्यातील तिसरी पिढी अर्थात रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशमुळे मोठे घराणे भाजपसोबत जोडले जात असल्याचा सर्वात जास्त आनंद आहे.
नव्या चेहर्यांना संधी- गिरीश महाजन
लोकसभा निवडणुकीत भाजप नव्या चेहर्यांना संधी द्यायला हवी. भविष्याचा वेध ओळखून राज्यातील मोठी घराणी भाजपवर विश्वास दाखवत आहेत. येत्या आठवडाभरात भाजपमध्ये आणखी लोक येतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.