पुणे: आपले मानसिक आरोग्य उत्तमरीत्या जोपासण्यासाठी आपण स्वतःच अनेक उपाय – योजनांची आखणी करू शकतो त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन युवक – युवतींनी एखाद्या गोष्टींपासून खचून न जाता त्याला सामोरे जात त्यामधून योग्य तो मार्ग काढण्यासाठी सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करावा व स्वतःच स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागरण समितीचे समन्वयक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण यांनी बावधन येथील सुर्यदत्त शिक्षण संस्था समूहाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेमध्ये युवकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पुणे येथील बावधन मधील सुर्यदत्त शिक्षण संस्था समूहाच्या वतीने एकदिवसीय “ नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते उत्तम निरोगी मानसिक आरोग्य या विषयी प्रा. चेतन दिवाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाच्या डीन प्रा. उज्वला वाबले या होत्या तर प्रा. अर्चना वाफगावकर व प्रा. दीपाली देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधील बदलत्या जीवनशैलींमुळे निर्माण होत असलेली युवकांची नकारात्मक विचारसरणी, अनपेक्षित भावनिक गुंतागुंत, मित्र – मैत्रिणी, पालक व परीजनांकडून असणारे अपेक्षांचे ओझे व त्यामुळे होणारे अपेक्षाभंग आणि त्यामुळे उद्भवणारे नैराश्य या व अशा अनेक समस्यांना सामोरे जात असताना युवकांच्या मनाची होणारी द्विधावस्था टाळण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी उत्तम मानसिक आरोग्य जोपासणे आवश्यक असून त्यासाठी त्यांनी आपल्या शारीरिक, भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रा. दिवाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. दिपाली देसाई यांनी स्वागत केले प्रा. अर्चना वाफगावकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनत पंडित यांनी केले तर आभार वैभवी लोणकर यांनी मानले