आदिवासी विकास महामंडळात लाभार्थ्यांच्या योजनांवर डल्ला; सव्वा कोटींच्या अपहाराबद्दल 8 तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांसह एका विजतंत्र्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….
जुन्नर /आनंद कांबळे
लाभार्थींना डिझेल इंजिन आणि गॅस शेगडीच्या वितरण योजनेत केलेल्या 1 कोटी 21 लाखांच्या अपहार प्रकरणी आदीवासी विकास महामंडळातील 8 तत्कालिन व्यवस्थापकांसह,एका विजतंत्र्यावर जुन्नर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी ही माहीती दिली आदीवासी विकास महामंडळात 2004 ते 2009 या कालावधीत हा अपहार झाला होता.या प्रकरणी विजय गांगुर्डे,प्रादेशिक व्यवस्थापक वर्ग 1 रा. नाशिकरोड,जिल्हा नाशिक यांनी फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अपहारप्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती.त्यावरुन न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यातून हा अपहाराचा प्रकार उघड झाल्याने ही फिर्याद देण्यात आली असून त्यावरुन जुन्नर येथे विविध कालखंडात कार्यरत असलेले तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांवर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये व्ही.टी.जामनिक,बी.जी.घाटकर,एम. पी.धुर्वे,
एस.एन.मांदळे,एम.एस.बुळे,जी.आर. सोनवणे,यु.के.मेंगडे,,एस.एन.मू न,या आठ माजी प्रादेशिक व्यवस्थापकांसह, तत्कालिन वीजतंत्री एस.एस.भारमल रा.जुन्नर या आठ आरोपींचा समावेश आहे.पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार संबंधित योजनेत आदीवासी लाभार्थींना द्यावयाची डिझेल इंजिन आणि गॅस शेगडी वितरणाची कोणतीही कागदपत्रे पुरावे न मिळाल्याने या अपहाराचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणी अधिक माहीतीनुसार जुन्नरच्या आदीवासी विकास महामंडळातील इंजिन,गॅस शेगडी लाभार्थींसाठी वाहतूक करुन देणारी नंदुरबार येथील आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्था आणि तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक यांनी 215 डिझेल इंजिनांची परस्पर विल्हेवाट लावून 38 लाख 55 हजार452 रुपये आणि तेलपंप फिटींग करुन कार्यान्वित करण्यासाठी दिलेली रक्कम 5 लाख 47 हजार 441 रुपये अशी एकूण 44 लाख 2 हजार 893 रुपयांचा अपहार केला होता.तर 2009 ते 2010 या कालावधीत अनुसुचित जमातीतील दारिद्ररेषेखालिल पात्र लाभार्थींना 100 टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या 511 गॅस शेगडी युनिटची बेकायदेशीर विल्हेवाट लावून अपहार करण्यात आला होता.यात 77 लाख 72 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला असून शासकीय रकमेचे नुकसान केल्याने संबंधित आठ प्रादेशिक व्यवस्थापकांसह वीजतंत्री असलेले भारमळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयीन आदेशानुसार गठीत केलेल्या समितीने पोलीसांना दिले होते.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या गुन्ह्याच्या अपहरीत रकमेची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात य़ेणार असल्याची माहीती श्री.नलावडे यांनी दिली.