महिला सक्षमीकरणासाठी ‘फ्लो हाफ मॅरेथॉन
पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज लेडीज ऑर्गनाइजेशन अर्थात फिक्की फ्लोच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी येत्या डिसेंबरमध्ये ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी फिक्की फ्लो आणि ब्रिजस्टोन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया आणि ब्रिजस्टोनचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ब्रिजस्टोन तसेच फ्लो पुणे चॅप्टरचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर गोल्ड स्पॉन्सर अशोक लीलँड, ब्रॉंझ स्पॉन्सर फिनोलेक्स इंड्स्ट्रीज आणि वॉटर पार्टनर विकिंग कॉर्पोरेशनमधील अधिकारी उपस्थित होते.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “या सामंजस्य करारांतर्गत समाजाच्या विविध स्तरातून येणाऱ्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देण्यासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे, कृषी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक आदी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांकरिता विविध कार्यक्रम, तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व त्यांना साहित्य पुरवले जात आहे. याशिवाय भारत ऍग्रो इंड्स्ट्रीज फाउंडेशनमार्फत कृषी क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी, सोयाबीन बियाणे देऊन उस्मानाबादमधील विधवा शेतकऱ्यांना मदत, टाटा स्ट्राईव्ह आणि सिंबायोसिस स्किलिंग युनिव्हर्सिटीच्या साहाय्याने तरुण मुलीना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण, वृद्ध नागरिकांना सहाय्य आणि मणक्याचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.” यंदाच्या मॅरॅथॉनची संकल्पना ‘शहरातून गावाकडे’ अशी असून, शहरातील महिलांच्या साथीने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मॅरेथॉनचे हे पाचवे वर्ष असून, गेली दोन वर्षे ब्रिजस्टोन या उपक्रमात सहभागी आहे. मगरपट्टा सिटी मैदानावर ८ डिसेंबर २०१९ रोजी ही मॅरेथॉन होणार आहे, असे पराग सातपुते यांनी सांगितले.