‘फिक्की फ्लो’कडून ५० युवतींना प्रशिक्षण
पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ब्रिजस्टोन, टाटा स्ट्राईव्ह यांच्या सहकार्यातुन ५० युवतींना कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टाटा स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अंतर्गत रिटेल सेल्स असिस्टंटचे प्रमाणपत्र या युवतींना देण्यात आले. रिटेल मॅनेजमेंटमधील प्रशिक्षणासाठी या उपक्रमांतर्गत २०१८ पासून भरघोस निधीची तरतूद केली जात आहे. या विस्तृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी युवतींना विविध विषयांचे धडे देण्यात आले. ९ आठवडयांचे क्लासरूम प्रशिक्षण व एक आठवड्याचे प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण देण्यात आले.
सहभागीना रिटेल स्टोअर लेआउट आणि मर्चंडाइज डोमेन याचे प्रशिक्षण दिले गेले. व्यावसायिक विकासाबद्दल मार्गदर्शन, सॉफ्टस्किल, संवादकौशल्य, अर्थसाक्षरता आदी गोष्टींचा या प्रशिक्षणामध्ये समावेश होता. प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतून प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना किरकोळ दुकानात काम करण्याची संधी देण्यात आली. यातील २५ युवतींना वेगवेगळ्या रिटेल स्टोअरमध्ये नोकरी मिळाली असून, उर्वरित २५ जणींना सहा आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवतींना दापोडी येथील टाटा स्ट्राइव्ह व्यावसायिक केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला फिक्की फ्लोच्या चेअरपर्सन रितु प्रकाश छाब्रिया, वरिष्ठ उपाध्यक्ष अनीता सणस, कोषाध्यक्ष अनिता अग्रवाल, अजय सेवेकरी, पराग जैन, ब्रिजस्टोनचे रानू कुलश्रेष्ठ, टाटा स्ट्राइव्हचे सदस्य उपस्थित होते.
महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देऊन सक्षमीकरण्याचे काम फिक्की फ्लोच्या माध्यमातून केले जाते. यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्या माध्यमातून हजारो युवतींना प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना पुरुषांइतक्याच संधी मिळाव्यात, या दृष्टीने फिक्की फ़्लो आणि ब्रिजस्टोन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीएसआर निधीमधून विविध मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरने गेल्या पाच वर्षात ४६२ सदस्य जोडत महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. शिक्षण, कौशल्याचे प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक सेवा, वृद्धाश्रमातील ज्येष्ठाना डायपर आणि प्राथमिक ज्ञान देण्याचे काम सुरु आहे, असे चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.