एकविसावे बंधुता साहित्य संमेलन भोसरीत
अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल
२१ व २२ डिसेंबरला होणार बंधुता चळवळीतील साहित्याचा जागर
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे होणार आहे. साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे संमेलन पूर्वनियोजनानुसार दिल्ली येथे होणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे संमेलनस्थळात बदल करण्यात आला असून, आता ते भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयाच्या प्रांगणात २१ आणि २२ डिसेंबरला होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती बंधुता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.
संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पिंपळे गुरव येथील ‘बंधुता भवन’मध्ये झालेल्या या सोहळ्याला प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य सदाशिव कांबळे, हाजी अफझलभाई शेख, मधुश्री ओव्हाळ, शंकर आथरे, महेंद्र भारती, प्रकाश जवळकर, संगिता झिंजुरके, प्रा. प्रशांत रोकडे आणि विश्वास रानवडे उपस्थित होते. ”महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध समुहांची साहित्य संमेलने होतात. मात्र बंधुता साहित्य संमेलनाने आपले वेगळेपण नेहमीच जपले असून, सांस्कृतिक चळवळीमध्ये बंधुताचे एक वेगळे दालनच निर्माण केले आहे. नियोजीत २१ वे साहित्य संमेलनही विचारांच्या पातळीवर आपले महत्व अबाधित ठेवून मूल्यविचारांचे बिजारोपण करेल,” असा विश्वास डॉ. पगारिया यांनी व्यक्त केला.