सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार गुरुदेव राकेशभाई यांना प्रदान
पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ पूज्य गुरुदेव श्री राकेशभाई यांना प्रदान करण्यात आला. ‘द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ने योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, स्ट्रटेजिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन इटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, नगरसेवक प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते. महात्मा गांधी, भगवान महावीर आणि श्रीमद राजचंद्र यांच्या प्रतिमांच्या फ्रेमचे अनावरण करण्यात आले.
दरवर्षी हा पुरस्कार ७ फेब्रुवारी रोजी सुर्यदत्ता संस्थेच्या वर्धापनदिनी दिला जातो. मात्र, गुरुदेव श्री राकेशभाईंच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे त्यांना त्यावेळी उपस्थित राहता आले नव्हते. नुकतेच सत्संगाच्या कार्यक्रमासाठी पूज्य राकेशभाई सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात आले होते. त्यावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात भरीव योगदान देणार्या प्रभावशाली व्यक्तींना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. याआधी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, अण्णा हजारे, माजी पोलिस अधिकारी डॉ. किरण बेदी, योगगुरु बाबा रामदेव, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर, अभिनेत्री डॉ. वैजयंतीमाला, उदित नारायण, शंकर महादेवन आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सन्माननीय व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात, असेही डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.