दहावीच्या विद्यार्थांसाठी मोफत मार्गदर्शन
पुणे : विद्यार्थांनी मागील वर्षी बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यास नेमका कसा करावा? याचे सखोल आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब पुणे युवा आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ युवा नेक्स्ट यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजिले आहे. येत्या सोमवारी (दि. 12 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सुपरमाईंड फाऊंडेशनच्या संचालिका अर्चिता मडके, मंजुषा वैद्य, रोटरी क्लब ऑफ युवाचे अध्यक्ष राहुल गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्रीकांत जोशी, निनाद जोग, अमेय जोग, ऋषिकेश कुलकर्णी उपस्थित होते.
अर्चिता मडके म्हणाल्या, “दहावीच्या अभ्यासाविषयी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी बोर्ड) व बालभारती पाठ्यपुस्तक सदस्य विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. मागील वर्षीचा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागण्याचे कारण विद्यार्थांची भाषा विषयांमधील अध्ययन कौशल्ये व स्वमताच्या प्रश्नांच्या लेखन तंत्राचा अभाव ही असल्याचे प्रामूख्याने आढळून आले आहे. त्यामूळे भाषा विषयांची तयारी कशी करावी, हे या सत्राचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय गणित व शास्त्र विषयांमध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळविण्याचे विशेष मार्गदर्शन तज्ज्ञ करणार आहेत.”
राहुल गडकरी म्हणाले, “आताचा अभ्यासक्रम स्व-अध्ययनावर आधारीत आहे. त्यामुळे स्व-अध्ययन म्हणजे काय? ते कसे करावे? याचे मार्गदर्शन शैक्षणिक समुपदेशिका मंजुषा वैद्य करणार आहेत. डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित), डॉ. स्नेहा जोशी (मराठी), अच्युत सोमण (इंग्रजी) या तज्ज्ञ शिक्षकांकडून अभ्यासाचे तंत्र यावर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला जाणार आहे. सत्राचे उद्घाटन रोटरी क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रवि धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुणवत्ता मिळविण्यासाठी हे सत्र उपयुक्त ठरणार आहे.